पुणे: गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकांच्या विचार करत योजना राबवल्या असून प्रत्येकाच्या भल्यासाठी ते काम करत आहेत. मोदींच्या विकासाच्या कामावर नागरिकांना विश्वास असून पुणेकरांची मन आम्ही जिंकली आहेत, त्यामुळे लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघात आम्हाला मताधिक्य मिळेल, असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार असणारे मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
लोकसभेची निवडणूक ही देशाचे भविष्य ठरवणारी आहे. मतदारांना निश्चितपणे आम्ही देशाचे भविष्य नरेंद्र मोदींच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकत हेच आवाहन करत आहोत. गेल्या दहा वर्षात देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या अंत्योदयाचा विचार करत त्यांच्या कल्याणासाठी केलेले काम, देशांमध्ये आज प्रत्येक घटकासाठी केलेले विकासकाम आणि जगामध्ये महासत्ता म्हणून देशाची नवी ओळख करून देण्याचं काम मोदींनी केल आहे. त्यामुळे पुणेकरांसह संपूर्ण देशाने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा निश्चय केला असल्याचेही मोहोळ म्हणाले.
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर, तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या तीनही उमेदवारांनी विविध माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी कोथरूड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात आमदार रवींद्र धंगेकर यांना कार्यकर्त्यांनी ४२ हजारांच्या निधीची थैली दिली. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत मोहोळ यांना विचारले असता मोहोळ म्हणाले, “कोथरूडमधील एका कार्यक्रमात कोणाला तरी (रविंद्र धंगेकर) नागरिकांनी निधी दिल्याचे सांगत असला, तर त्यावर मला बोलायच नाही. पण तुम्हाला (रविंद्र धंगेकर) निधी मिळाला म्हणजे प्रेम मिळाले असे होत नाही. पण माझ्यासोबत पुणेकरांचे प्रेम आहे. तुम्ही लोकांसाठी काय करणार आहात आणि काय आहात, हे अधिक महत्वाचे आहे”