पुणे : वाढत्या शहरीकरणामुळे पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढताना दिसते. अशातच यावर उपाय म्हणून शहरात मेट्रोचे जाळे पसरत आहे तर काही भागांमध्ये उड्डाणपूलांचे काम करण्यात आले आहे. शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा रस्ता असणाऱ्या उड्डाणपूलावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळते. या ठिकाणच्या उड्डाणपूलाचे काम पूर्ण होऊन दीड महिना लोटला तरीही हा उड्डाणपूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. अखेर या उड्डाणपूलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे.
या उड्डाणपूलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मिळत नसल्याने अखेर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. येत्या गुरुवारी ०१ मे रोजी उद्घाटन होणार असून महाराष्ट्र दिनी हा उड्डाणपूल पुणेकरांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलामुळे राजाराम पूल ते वडगावकडे जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
२०२१ मध्ये या पूलाचे भूमीपूजन झाले होते. या पुलाचे काम पूर्ण होऊन दीड महिना उलटला आहे. या पुलाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात आले होते, पण त्यांची तारीख मिळाली नव्हती. फडणवीस पुण्यात दोन दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित होते, परंतु या काळातही हा उड्डाणपूल खुला होऊ शकला नाही.
‘त्या’ व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग
मुंबईपेक्षाही भयानक गर्दी झाल्याचा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सिंहगड रोडने प्रवास करणाऱ्या त्रस्त नागरिकांनी संताप व्यक्त केला. या वाहतूक कोंडीमध्ये नागिरक तब्बल ४ तास अडकून होते. त्यानंतर विरोधकांनी देखील यावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर ताशेरे ओढले. त्यानंतर महापालिका प्रशासनाला राज्य सरकारतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केले जाईल, असा निरोप देण्यात आला आहे. त्यामुळे आता येत्या २ दिवसांत हा पूल वाहतूकीसाठी खुला होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुणे महापालिकेला मिळाले ‘हे’ नवे अतिरिक्त आयुक्त
-“पाकिस्तानचं पाणी बंद केलंच नाही, सरकार खोटं बोलतंय”; प्रकाश आंबेडकरांचं दाखवलं ‘ते’ पत्र
-परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची चिंता मिटली; प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा प्रश्न मार्गी