पुणे: उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे बाणेर येथील पुणे महानगरपालिकेच्या कै. धनंजय मधुकर ताम्हाणे जलतरण तलावावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पोहण्यासाठी तसेच पोहणे शिकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे लहान मुले मोठ्या प्रमाणावर जलतरणाचा आनंद घेत आहेत, त्यामुळे तलाव फुलून गेले आहेत.
प्रसिद्ध द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. तपन कुमार पाणिग्रही या तलावावर दर्जेदार प्रशिक्षण देत असून, अत्यल्प शुल्कात मुलांना जलतरण प्रशिक्षण मिळत आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू येथे नियमित सरावासाठी येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढल्याने उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी नागरिक जलतरण तलावांचा आसरा घेत आहेत. लहान मुलांसोबत त्यांच्या पालकांनीही जलतरणाचा आनंद घेण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः सकाळच्या वेळेस तलावावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
बाणेर परिसरातील इतर खाजगी जलतरण तलावांच्या तुलनेत महानगरपालिकेच्या या तलावावर माफक दरात कोचिंग तसेच पोहण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. येथे महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षिकेची सोय असून, खाजगी तलावांमध्ये आकारल्या जाणाऱ्या ५ ते ७ हजार रुपयांच्या तुलनेत येथे अत्यल्प दरात जलतरण प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलेही दर्जेदार प्रशिक्षण घेऊ शकतात.
या तलावामध्ये उत्तम सुविधा उपलब्ध असून, चेंजिंग रूम, शॉवर तसेच पोहण्यासाठी आवश्यक ड्रेस सक्तीचा करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिक समाधानी असून, लहान मुलांसह पालकही जलतरणाचा आनंद घेत आहेत.