पुणे : पुणे शहरामध्ये अतिमुसळधार पाऊस आणि खडकवासला धरणक्षेत्रातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे पुणे शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आणि नदीकाठच्या सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी साठले आहे. हजारो नागरिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचे आश्वासनही दिले.
पुराच्या पाण्याने सर्वात जास्त प्रभावित झालेल्या एकता नगरी भागात पुरग्रस्त कुटुंबियांच्या भेटी घेत संवाद साधला. पाणी ओसरल्यानंतरच्या विविध समस्यांबाबत नागरिकांशी चर्चा केली आणि त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. तसेच महापालिकेच्या माध्यमातून या परिसरात सुरु असलेल्या उपाययोजना आणि मदतकार्याला वेग देत तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील पूर परिस्थीतीचा आयोजित आढावा बैठकीत मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे. ‘जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पुरबाधित क्षेत्रातील स्थलांतरीत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. या भागात स्वच्छता करण्यासोबतच नागरिकांना अन्न, स्वच्छ पाणी देण्याची सोय करावी. नागरिकांची आरोग्य तपासणी करावी, रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. याकरीता पुरेसे मनुष्यबळ वाढवावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरीता पुराच्या पाण्यात खराब झालेले किंवा वाहून गेलेले दाखले उपलब्ध करून द्यावेत’, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
धरणातील पाण्याचा विसर्गामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता विसर्ग करण्यापूर्वी जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महसूल, महानगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक यंत्रणांना कळवावे, जेणेकरुन त्यासूचना नागरिकांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल. नदीपात्रावरील गावातील नागरिकांना स्थानिक यंत्रणेच्या माध्यमातून धरणातील पाणी विसर्गाबाबत सूचना द्याव्यात. शहरातील पुरबाधित भागात सीसीटिव्ही यंत्रणा कायान्वित करण्यात यावी. महावितरणच्यावतीने खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पुर्वरत करावा. पुणे शहरात निर्माण झालेली पूरपरिस्थिती भविष्यात उद्भवणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी, असेही मोहोळ म्हणाले.
बैठकीस उपस्थितीत लोकप्रतिनिधींनी धरणातील पाणीसाठा, विसर्गाबाबत वेळोवेळी अद्ययावत सूचना, पुरबाधित भागातील नुकसानीचे पंचनामे करुन बाधित नागरिकांना मदत, त्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई, नदीपात्रातील भराव काढणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केल्या.
महत्वाच्या बातम्या-
-राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; शिंदे गटाकडून मनधरणीचे प्रयत्न
-‘स्मार्ट सिटी’ म्हणवणाऱ्या पुण्याचा विकास पूरात; एकाच पावसात झाली दुर्दशा
-Pune Rain: पुणेकरांना काहीसा दिलासा; पाऊस थांबला पण वीज अद्यापही गुल