पुणे : भाजपमध्ये असणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी काल व्हाट्सअप स्टेटसला थेट तुतारीचे चिन्ह ठेवल्याने चर्चेला आणखीनच उधाण आला आहे. दुसरीकडे शरद पवारांसोबत सुरुवातीपासूनच असणारे इंदापूरमधील बडे प्रस्थ प्रवीण माने यांनी मात्र आता आक्रमक पवित्रा घेतल्याचा दिसत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाला माने यांच्याकडून विरोध केला जात असून दोन दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय येणार असल्याचं सांगितलं आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भरणे यांनाच मिळणार असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे भाजपमध्ये असणारे हर्षवर्धन पाटील हे गेल्या काही काळापासून अस्वस्थ होते. नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील त्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने पाटील यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील या भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. आजच त्या आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त देखील प्रसिद्ध झाले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती जाण्याचा निर्णय घेतल्याने इंदापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत अजितदादांसोबत जाणारे प्रवीण माने यांनी निकालानंतर स्वगृही परतत शरद पवारांची साथ दिली. माने हे इंदापूर मधून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र आता हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चेने माने समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे उमेदवारी बाबत कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय जाहीर करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अंकिता पाटील कापणार भाजपचे दोर; आजच देणार पदाचा राजीनामा
-पुण्यात महिला असुरक्षितच; मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीसोबत….
-‘झापूक-झुपूक’नंतर आता ‘डंके की चोटपर’; गुनरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरात
-वडिलांना की मुलाला उमेदवारी कोणाला? पुण्यात दोन मतदारसंघात ‘फॅमिली ड्रामा’
-अल्पवयीन आरोपींचं वय किती असावं? अजित पवार करणार शहांकडे मोठी मागणी