पुणे : पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आहे. मात्र तरीही पुणे शहरात ड्रग्ज सापडतच आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी परिसरात ३ हजार ६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आणखी एक कारवाई केली असून मेफेड्रोन बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा ३६० किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे.
एका ट्रकमधून हा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पश्चिम बंगालवरुन गजाआड करण्यात आलेल्या सुनील बर्मन याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी विश्रांतवाडीमध्ये कारवाई करण्यात आलेल्या गोदामापासून ३ किलोमीटर अंतरावर हा ट्रक उभा करण्यात आलेला होता. हा ट्रक देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
“पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन कोटीचे ‘एमडी’ पकडले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये अद्याप तरी कोणताही समान धागा आढळून आलेला नाही. आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज बनवणारे आणि मोठ्या प्रमाणावर त्याचे वितरण करणारे यांच्यावर तपासात लक्ष केंद्रित केले होते. त्यावर समाधानकारक काम झाले आहे. आता पुढच्या टप्प्यात आम्ही ही ‘सप्लाय चेन’ तोडण्याचे ठरवले आहे. ड्रग्ज तस्कर (पेडलर) आणि ग्राहक इथपर्यंतची सर्व साखळी आम्ही शोधत आहोत. अनेक लोक आमच्या रडारवर आहेत” असं आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहेत.
या प्रकरणी वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, रा. सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय ४०, रा. विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (वय ४०), युवराज बब्रूवान भुजबळ (वय ४१, रा. डोंबिवली पश्चिम), दिवेश चिरंजीव भुटीया (वय नवी दिल्ली), संदीप राजपाल कुमार (रा. नवी दिल्ली), संदीप हनुमानसिंग यादव (रा. नवी दिल्ली), आयुब अकबरशहा मकानदार (वय ४४, रा. कुपवाड, सांगली), देवेंद्र रामफूल यादव (वय ३२, रा. नझफगढ, नवी दिल्ली), सुनीलचंद्र विरेन्द्र बर्मन (वय ३५, रा. कुचविहार, मथगंगा, पश्चिम बंगाल) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार संदीप धुनिया (रा. पाटणा, बिहार) हा अद्याप फरार आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विठ्ठल वसंतराव साळुंखे (वय ४७) यांनी फिर्याद दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“अजितदादा हळूच मला गृहखातं मागतील पण मी ते माझ्याकडेच ठेवणार”; फडणवीसांचा मिश्किल टोला
-“छत्रपती संभाजी महाराज एकही ‘निवडणूक’ हरले नव्हते”; अजित पवारांकडून भाषणात झाली चूक
-कसबा गणपती मंदिरात जाताना ‘या’ गोष्टी लक्षात घ्याच; पाळावे लागणार आहेत नियम
-ड्रग्ज प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक; ४५ कोटी रुपयांचे एमडी जप्त
-मुख्यमंत्र्यांसह फडणवीस अन् अजितदादा स्टेजवर, शरद पवार बोलायला उठताच बारामतीकरांचा जल्लोष