पुणे : कल्याणीनगरमध्ये झालेले हिट अँड रन प्रकरण सद्या पुणे शहरासह राज्यभरात गाजत आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्या अलिशान पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने संगणक अभियंता युवक युवतीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर जनक्षोभ उसळून आल्याने पोलीस खात्यासह, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिका खडबडून जागी झाली आहे. शहरातील अनधिकृत पबसह परमिट रूमवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याने शहरातील बार मालकांनी याचा चांगलाच धसका घेतल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
२५ वर्षांखालील व्यक्तीस दारूची विक्री करण्यास कायद्याने मनाई आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश बारस् बाहेर अशाप्रकारची सूचना देणारे फलक लावण्यात आले असून ओळखपत्राची तपासणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे. महाराष्ट्रात विदेशी दारू विकत घेणे, बाळगणे, वाहतूक करणे, वैयक्तिक सेवन व वापरासाठी एक दिवसीय परवाना दिला जातो. हा परवाना असल्याशिवाय परमिट रूममध्ये दारू दिल्यास कारवाई होऊ शकते. आजवर या नियमाला सोईस्करपणे फाट्यावर मारले जात होते. मात्र पोलिसांकडून कारवाईच्या धडाका लावल्याने ग्राहकांना त्यांच्या टेबलवरच हा परवाना उपलब्ध करून दिला जात आहे.
अनेक हॉटेल व्यावसायिकांकडून परवानगी मिळालेल्या जागेपेक्षा अधिक टेबल लावून दारूची सर्रास विक्री केली जात होती. मात्र आता जेवढा परवाना तेवढेच टेबल हे चित्र देखील दिसू लागले आहे. कल्याणीनगरमध्ये दोन निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागल्यानंतर खडबडून जागे झालेल्या यंत्रणांकडून कारवाई करण्यात आल्यानंतर शहरात हे चित्र दिसू लागले आहे. मात्र कायद्याचे बंधन असताना देखील चिरीमिरीसाठी आजवर सर्व पायदळी तुडवले जात होते. आता दाखवण्यासाठी का होईना यंत्रणा आणि बारकडून नियम पाळले जात असेल तरी हे किती दिवस सुरू राहणार हा प्रश्न कायम राहतो.
महत्वाच्या बातम्या-
-मलायका आरोराच्या ‘त्या’ कृत्यामुळे सर्वत्र होतंय कौतुक; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
-कल्याणीनगर अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम; ‘माझ्या समोर ती मुलगी हवेत उडाली अन्…’
-Pune Hit & Run : ”ते’ पाप भाजपने केलंय, फडणवीसांची भूमिका संशयास्पद’; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
-“सुप्रिया सुळेंमुळेच सगळे शरद पवारांना सोडून जात आहेत, मी आणि धीरज शर्मादेखील…”