पुणे : पुणे शहरामध्ये आता दिवसेंदिवस झिका व्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. शहरामध्ये आता आणखी २ गर्भवती महिलांना झिकाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरामध्ये झिकाची भीती वाढू लागली आहे. झिकाचा संसर्ग हा गर्भवती महिलांसाठी धोकादायक आहे, असे असतानाच सोमवारी येरवड्यातील गर्भवती आणि त्यानंतर मंगळवारी (दि. ९) आणखी दोन गर्भवती महिलांसह एका तरुणाला झिकाचा संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे.
शहरामध्ये लागोपाठ झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांची नोंंद होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची काळजी वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. महापालिकेकडून योग्य काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
शहरातील झिकाबाधित रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. यात आठ गर्भवतींचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये गर्भवती महिलांचे प्रमाण अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बावधन भागातील उजवी भुसारी कॉलनी परिसरात १५ वर्षीय तरुणाला झिका संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाषाण परिसरात १८ वर्षीय आणि १९ वर्षीय या दोन गर्भवतींनाही झिकाच्या संसर्गाचे झाल्याचे निदान झाले आहे. यातील १८ वर्षीय महिला ही २८ आठवड्यांची गर्भवती असून तिच्यामध्ये सांधेदुखी, डोकेदुखीची लक्षणे आढळून आली आहेत.
१९ वर्षीय महिला ही २३ आठवड्यांची गर्भवती आहे. तिच्यामध्ये घसा खवखवण्याची लक्षणे दिसून आली आहेत. सध्या या दोन्ही गर्भवतींची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. शहरात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये गर्भवती महिलांचे प्रमाण वाढत असल्याने शहरातील गर्भवती महिलांची तपासणी करण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन भास्कर जाधवही संतापले; म्हणाले, “चेंबरमध्ये बसून लोकांचे…”
-अजित पवार गटातील नेते शरद पवार गटात येणार? शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
-वसंत मोरेंनी बांधलं शिवबंधन; पक्षप्रवेश होताच मोरे म्हणाले, ‘मी पक्षात प्रवेश केला नाही तर…’