पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला देशभरात बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. सलमानी समाजासह बंजारा समाज, कामगार वर्ग, अल्पसंख्याक समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहत असल्याने पक्ष अधिक सक्षम होत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्यापक होत आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी बुधवारी सांगितले. ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाचे संमेलन घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात आयोजिले होते.
दीपक मानकर म्हणाले, “सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादांचे नेतृत्व आहे. दलित, मुस्लिम, आदिवासी, वंचित अशा अल्पसंख्याक समुदायांना अजित पवार यांनी नेहमीच मानसन्मान दिला आहे. येत्या निवडणुकीतही अल्पसंख्याकांना १० टक्के जागा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सलमानी समाजाच्या सर्व अडचणी सोडवण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस येत्या काळात भर देईल.”
धीरज शर्मा म्हणाले, “विकासाच्या मुद्यांवर अजितदादा महायुतीसोबत गेलेले आहेत. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसह आणलेले इतर अनेक उपक्रम महाराष्ट्रातील जनतेत लोकप्रियता मिळवत आहेत. त्यामुळे सध्या जे वातावरण निर्माण केले जात आहे, त्याचाच कोणताही फटका महायुतीला बसणार नाही. हरियाणामध्येही अशीच वातावरण निर्मिती केली गेली. मात्र, तिथे भाजपने बहुमत मिळवले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
ऍड. जरीफ अहमद सलमानी म्हणाले, “महाराष्ट्रात जवळपास ७३ मतदारसंघात सलमानी समाज वास्तव्यास आहे. अजितदादांचे नेतृत्व विकासाभिमुख आणि सर्व समाजाच्या हितासाठी कार्यरत असणारे आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सलमानी समाज पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहील. पक्षाने एखाद्या जागेवर निवडणूक लढण्याची संधी दिल्यास त्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”
महत्वाच्या बातम्या-
-जुन्नर विधानसभेत मोठा ट्विस्ट! राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाखतीत अचानक पोहचला काँग्रेस नेता
-सस्पेन्स कायम! अजित पवार बारामतीमधून लढण्याबाबत म्हणाले, ‘महायुतीत…’