पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. अशातच रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशाच्या मागणी केली. गर्भवती महिलेचा रक्तस्त्राव होत असताना देखील पैसे भरल्याशिवाय दाखल करुन घेणार नसल्याचं सांगण्यात आलं. परिणामी महिलेचा दुसऱ्या रुग्णालयामध्ये प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. यावरुन हे प्रकरण चांगलेच तापले आहे. अशातच आता रुग्णालयाला जमीन दान केलेल्या खिलारे कुटुंबियांबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.
भाऊसाहेब खिलारेंनी ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या सांगण्यावरुन लता मंगेशकरांना रुग्णालयासाठी जमीन दिली होती. या सगळ्या घटनेवर आता खिलारे कुटुंबीयातील वारस चित्रसेन खिलारे यांनी एका वृत्तलवाहिनीशी संवाद साधला. यावेळी चित्रसेन खिलारे यांनी या रुग्णालयाबद्दल खिलारे कुटुंबियांना आलेले अनुभव सांगितले आहेत.
“बाळासाहेब खिलारे यांच्या डेक्कन परिसरात मोठ्या होत्या. सामाजिक संस्थांसाठी त्या मोठ्या प्रमाणात दान करण्यात आल्या होत्या. १९८९ साली लता मंगेशकरांनी रुग्णालयासाठी जमीन मागितली. लता मंगशकरांनी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी भाऊसाहेबांना जागेसाठी विचारलं. तुमच्या अनेक जागा या सामाजिक कार्यासाठी वापरल्या गेल्या आहेत, आता गरिबांसाठी एक रुग्णालय उभा राहत असेल तर ती चांगली गोष्ट असल्याचं पवारांनी म्हणाले”, असे चित्रसेन खिलारे यांनी सांगितले आहे.
रुग्णालयाचं उद्घाटन करायचा कार्यक्रम ठरला त्यावेळी आम्हाला निमंत्रण पत्रिका आली होती. त्या कार्यक्रमाला गेलो असता भाऊसाहेबांना मागे कुठेतरी, चौदाव्या-पंधराव्या रांगेत बसवण्यात आलं होतं. भाऊसाहेबांना पाहताच एक महिला पोलिस अधिकारी धावत आल्या आणि त्यांनी खंत व्यक्त केली. ज्यांनी रुग्णालयासाठी जागा दिली त्यांनाच पुढे बसायला जागा नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावर भाऊसाहेबांनी कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण आमच्या वडिलांची धारणा होती की एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला समजता कामा नये. त्यांनी कधीही कुठेही श्रेय घेतलं नाही, असेही चित्रसेन खिलारे यांनी सांगितले.
‘सध्या रुग्णालयावरुन वाद सुरु आहे. यावरुन मला फोन येत आहेत. तुमची जागा असताना हे असं कसं काय होतं आहे मला विचारणा झाली. व्हॉट्स अॅपवर एक पोस्ट फिरत होती की ही मूळ जागा बाळासाहेब फुलेंची आहे. त्यांना हा गैरसमज झाला. बाळासाहेब खिलारे हे आमच्या वडिलांचे म्हणजेच भाऊसाहेबांचे मित्र होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक असंवेदनशील विषय झाला ही घटना दुर्दैवी आहे. खिलारे कुटुंबाला आपली जागा गेली याच्याशी काही घेणंदेणं नाही. अजूनही जागा लागल्या तर आम्ही उपलब्ध करुन देऊ’, असेही चित्रसेन खिलारेंनी सांगितले आहे.
एखाद्या रुग्णाला पैशामुळे दाखल करुन घेतलं जात नाही आणि तो रुग्ण दगावतोय. 35 वर्षानंतर आता असं वाटतंय की आम्ही चूक केली का? त्या ठिकाणी आमची शेती होती. आम्ही स्वतःचा ट्रस्ट न काढता ती जमीन मंगेशकरांना दान केली. प्रत्येक रुग्णाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना त्यामागे होती. पण आज पैशा भरला नसल्याने रुग्ण दगावतोय. आपण सगळे इतके संवेदनशील झालोय का?, असा सवालही यावेळी खिलारेंनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘रुग्णांकडून कोणतंही डिपॉझिट घेऊ नका’; पालिकेने धाडली सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस
-अवघ्या ६ महिन्यात वाढले दीड लाख मतदार; पुण्यात ‘या’ भागात सर्वात जास्त मतदार
-‘रुग्णालयाकडून ४८ तासात कर वसूल करा नाही तर मी..’; सुप्रिया सुळेंचा इशारा
-तनिषा भिसे मृत्यू प्रकरण: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. घैसास यांचा राजीनामा