पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. महाविकास आघाडीला मिळालेल्या अपयशानंतर मविआच्या अनेक नेत्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. मतमोजणी प्रक्रियेत घोळ घातल्याचा आरोप करत बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांनी मतदान यंत्रणेच्या तपासाबाबत अर्ज केला होता. आता युगेंद्र पवार यांनी हा अर्ज मागे घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मतदान यंत्राविरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी या प्रकरणी माघार घेतली आहे. यावरुन आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मतमोजणी वेळी एखाद्या उमेदवाराने दोन तासांच्या आत आक्षेप घेतल्यास फेरमतमोजणी घेण्यात येते. त्यानंतर आक्षेप आल्यास व उमेदवार न्यायालयात गेल्यास फेर मतमोजणी घेण्यात येते. त्यासाठी सर्व मतदान यंत्रांमधील मतांची माहिती ४५ दिवसांसाठी सुरक्षित ठेवली जाते. हा कालावधी येत्या ६ जानेवारीला संपत आहे. त्याआधीच युगेंद्र पवार यांनी फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेतला आहे.
युगेंद्र पवार यांनी याबाबत जिल्हा निवडणूक शाखेकडे अर्ज केला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांमधील महाविकास आघाडीच्या ११ पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्राच्या तपासणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे अर्ज केले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ व काँग्रेसच्या ३ उमेदवारांचा समावेश आहे.
शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपरसमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे, तर दौंडमधील रमेश थोरात यांनी देखील फेरमतमोजणीसाठी अर्ज केला आहे. दरम्यान युगेंद्र पवारांनी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मोहोळ कुटुंबाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘कार्यकर्त्याला आणखी काय हवं’
-चेहरा भोळा अन् कुटाने सोळा! प्रसिद्ध बिल्डरचे ४ कोटी लुटणाऱ्या गुडियाला बेड्या
-‘लाडक्या बहिणीं’साठी खूशखबर! फडणवीसांनीच सांगितलं योजनेचा हफ्ता कधी येणार
-मरावे परि अवयव रुपी उरावे; तिच्यामुळे आठ जणांना मिळाले जीवदान
-सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला; भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ