पुणे : एसटी महामंडळाच्या लांबच्या प्रवासासाठी अनेकदा प्रवाशांना जेवण, नाश्त्यासाठी ठराविक हॉटेल्स दिले आहेत. अशा हॉटेल्समध्ये प्रवाशांना बेचव आणि महागडे जेवण, नाश्ता प्रवाशांच्या माथी मारला जातो. अशावेळी नाईलाजास्तव प्रवासी देखील पदार्थ महागड्या किंमतीत विकत घेतात. हे अन्न बेचव तर कधी ते अस्वच्छ देखील असते. हा सर्व प्रकार म्हणजे एक प्रकारे प्रवशांच्या जीवाशी खेळ असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘बसथांबा असणाऱ्या सर्व हॉटेल आणि मॉटेलची झाडाझडती होणार असून प्रवाशांना सकस आणि किफायतशीर जेवण मिळत नसेल तर अशा थांब्यांची तपासणी करुन ती रद्द करावेत, असे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
प्रवाशांना हॉटेल-मोटेल थांब्यावर आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश देखील प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल येत्या १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना दिल्या आहेत.
लांब पल्ल्याच्या प्रवासा वेळी एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा-नाष्टा अथवा जेवण तसेच प्रसाधनगृहासाठी वेळ दिला जातो. मात्र अनेकदा हॉटेल चालकमालकांकडून याचा गैरफायदा घेतला जातो. प्रसाधनगृहे अस्वच्छ, अन्न बेचव, अशुद्ध तसेच महाग असणे, फराळाचे जिन्नस शिळे असणे अशा तक्रारी थांब्या बाबत प्रवाशांकडून सतत येत आहेत. संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या देखील तक्रारी येत आहेत. त्यामुळे या संदर्भात कारवाईचे आदेश मंत्री सरनाईकांकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्विकारण्याचे निर्देश दिले आहेत. ‘कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी’, असे स्पष्ट निर्देश यावेळी सरनाईक यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-औंधमध्ये गाळेधारकांना बेकायदा परवाने वाटप; ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश
-काका-पुतणे पुन्हा एकदा एकत्र दिसणार! अजित पवार- शरद पवारांची १० दिवसांत तिसरी भेट
-PMC: ठेकेदाराचे ‘लाड’ पुरवण्यासाठी अधिकारीच बनले ‘सैनिक’, बहुउद्देशीय पायघड्यांवर गुळगुळीत उत्तर
-“पवारांच्या जवळच्या संघटना ऐतिहासिक विषय उकरुन काढतात, त्यांनी फावल्या वेळात…” – गोपीचंद पडळकर