पुणे : व्यवसायाला जिद्द आणि चिकाटीची जोड दिली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे आपण कायम ऐकत आलेलो आहोत. याचेच मूर्तीमंत उदाहरण ठरत आहे ते बारामती तालुक्यातील माळेगाव येथील तेजस निंबाळकर हा युवक. दहावी झाल्यानंतर तेजस यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि २०१७ साली आंबा विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली. यामध्ये त्यांचे बंधू पुष्कर निंबाळकर यांची देखील साथ मिळाली. या दोन भावंडांनी आपल्या कष्टाने आणि दूरदृष्टीने आंबा विक्रीचा यशस्वी व्यवसाय उभारला आहे. २५ पेट्यांच्या विक्रीपासून सुरू झालेला व्यवसाय आज १२ हजार आंबा पेट्यांवर गेला असून दरवर्षी लाखोंची उलाढाल होत आहे.
तेजस यांनी सुरुवातीला २५ पेट्या आंब्यांची विक्री करण्याचा प्रयत्न केला, यामध्ये त्यांच्या मेहनतीला आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र, २०२० साली आलेल्या कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले. याच वेळी तेजस आणि पुष्कर यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून आपल्या व्यवसायाला वेग दिला. त्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून थेट ग्राहकांशी संपर्क साधला आणि त्यांचा व्यवसाय राज्यभर पोहोचवला.
निंबाळकर बंधूंकडे स्वतःचा केवळ ५ एकर शेती आहे. आंबा मोसमामध्ये थेट कोकणातील देवगड आणि रत्नागिरी येथील शेतकऱ्यांसोबत करार करून आंबा खरेदी केली जाते. पॅकिंग करून तो थेट ग्राहकांपर्यंत २४ ते ४८ तासांमध्ये पोहोचवण्याचा निंबाळकर बंधूंचा प्रयत्न असतो. उत्कृष्ट सेवा आणि विश्वासार्ह व्यवहारामुळे त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
आजच्या घडीला महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांचे वेगवेगळे ३६ ग्रुप असून त्यामध्ये सुमारे १२ ते १३ हजार सदस्य आहेत. यामधून ते थेट ग्राहकांपर्यंत तसेच किरकोळ विक्रेत्यांपर्यंत अस्सल देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्यांची विक्री करतात. त्यांनी आपल्या गावातील प्रसिद्ध कुणकेश्वर महादेवाच्या नावाने ‘कुणकेश्वर आंबा सप्लायर्स’ ही फर्म सुरू केली आहे.
तेजस निंबाळकर हे आज हजारो तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण बनले आहेत. त्यांची जिद्द, परिश्रम आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता यामुळे ‘कुणकेश्वर आंबा सप्लायर्स’ हे नाव आता महाराष्ट्रभर परिचित झाले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासातून अनेक तरुणांना व्यवसायाच्या नव्या वाटा शोधण्याची प्रेरणा मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हाय सिक्युरटी नंबर प्लेटचं गौडबंगाल! सामान्यांना हजारोंचा भुर्दंड कशासाठी?
-उद्यापासून दहावीची परिक्षा; ७०१ परीक्षा केंद्रांवरील पूर्ण स्टाफ बदलला, नेमकं कारण काय?
-शिवजन्मोत्सव: सरदारांकडून शिवरायांना वंदन; शिवजयंतीच्या जल्लोषाने दुमदुमली पुण्यनगरी
-मोठी स्वप्न घेऊन पुण्यात आली, पण बारामतीच्या तरुणीला ‘जीबीएस’नं गाठलं अन्…