पुणे : पुणे-सोलापूर रोडवरील थेऊरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिलेने पोटच्या दोन जुळ्या मुलांना घराच्या छतावरील टाकीत बुडवून मारल्याची घटना समोर आली आहे. मुलांना टाकीत बुडवून तिने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला वाचवण्यात यश आलं आहे. जुळ्या मुलांचा खून केल्याप्रकरणी प्रतिभा हेमंतकुमार मोहिते (वय ३५, सध्या रा. काकडे वस्ती, दत्तनगर, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता, मूळ रा. मिरजवाडी, आष्टा, जि. सांगली) या महिलेला अटक करण्यात आली आहे. याबाबत प्रल्हाद लक्ष्मण गोंडे (रा. काकडे वस्ती, दत्तनगर, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभाचे माहेर काकडे वस्ती परिसरात आहे. तिचे पती सांगलीतील एका बँकेत कामाला आहेत. सध्या ती माहेरी राहत होती. दहा वर्षांपूर्वी तिचा हेमंतकुमार यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर १० वर्षे अपत्यप्राप्ती न झाल्याने मोहिते दाम्पत्याने कृत्रिम गर्भधारणा (टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट) करण्याचा निर्णय घेतला. टेस्टट्युबद्वारे प्रतिभाने दोन मुलांना जन्म दिला.
जुळी मुले दाेन महिन्यांची होती. त्यांची वाढ नीट होत नसल्याने प्रतिभा तणावात होती. मंगळवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास प्रतिभा जुळ्या मुलांना घेऊन घराच्या छतावर गेली. त्यानंतर दोघांना त्यांना पाण्याच्या टाकीत बुडवले आणि स्वत: देखील आत्महत्येचा प्रयत्न करत होती. हा सर्व प्रकार शेजारच्यांनी पाहिला त्वरीत प्रतिभाच्या भावाला सांगितले. मुलांसह प्रतिभाला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रतिभा सुखरुप असून उपचारांपूर्वीच जुळ्या मुलांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महिला आरोपी विरुद्ध बीएनएस कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार हे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ठाकरेंना मोठा धक्का; महिला आघाडीने दिले धडाधड राजीनामे
-‘अनामत रक्कम घेण्याचा रुग्णालयांना अधिकार’; इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठकीत भूमिका
-‘४० लाख रुपये भरा अन् मृतदेह घेवून जा’; २६ वर्षे रुग्णसेवा केलेल्या डॉक्टरसोबतही ‘दीनानाथ’ची वागणूक
-दीनानाथ रुग्णालयाला पालिकेचा कर भरावाच लागणार; पालिकेने बजावली वसुलीसाठी नोटीस