पुणे : श्रीराम नवमी उत्सव रविवारी मोठा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी चौकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. अशातच भाजपचे माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी शहातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत राम नवमी उत्सव साजरा करण्यावरुन जे चित्र त्यावरुन खंत व्यक्त केली आहे.
‘काल जे चित्र दिसले त्याने मन विषन्न झाले. प्रभू श्रीरामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. त्यांच्याच जन्माचा उत्सव साजरा करताना तरुणाईला मर्यादांचे, प्रतिकांचे आणि संस्कारांचे भान राहताना दिसत नाही, हे गंभीर आहे. अशा उत्सवातून या महापुरुषांच्या चारित्र्याची, सदगुणांची माहिती नव्या पिढीला मिळावी आणि एका दिव्य प्रेरणेतून त्यांनी ती मूल्यं आपल्या जीवनी अंगिकारावीत हा उद्देश आहे. पण जे चित्र दिसले त्यात या उद्देशाची पायमल्ली होताना जाणवली’, असे म्हणत सनी निम्हण यांनी खंत व्यक्त केल्याचे पहायला मिळाले आहे.
“खरे म्हणजे पुण्यात आबांनी हिंदवी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रेची सुरुवात केली होती. त्याचे स्वरुप पारंपारिक आणि हिंदू संस्कृतीला साजेसे होते. यावर्षी गुढीपाडव्याला याच संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या काही शोभायात्रा बघायला मिळाल्या. तेंव्हा खूप समाधान वाटले होते, पण काल मात्र काहीसे वेगळे चित्र बघायला मिळाले. पण असे असतानाही काही शोभायात्रा मात्र याच पायंड्यावर आधारित दिसल्या. त्यातले चित्र वेगळे आणि प्रेरक होते. स्त्री-पुरुष, अबालवृद्ध, तरुणाई पारंपरिक वेशभूषा करून सहभागी होताना दिसली. यात्रेत ढोल, लेझीम, पालखी, झेंडानृत्य, तलवारबाजी, लाठीनृत्य असे पारंपरिक प्रकार बघायला मिळाले. या शोभायात्रेत प्रभू श्रीरामांच्या व्यक्तित्वाचे आणि चारित्र्याचे दर्शन घडत होते. पण दुसरीकडे डीजेच्या तालावर थिल्लर गाणी लावून बीभत्सपणे थिरकणारी तरुणाई बघून मनाला वेदना होत होत्या”, असे सनी निम्हण पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
“हिंदू असल्याचा मलाही सार्थ अभिमान आहे, श्रीरामाची मी पण मनोभावे आराधना करतो, आपल्या हिंदू धर्मातील उत्सव जोरात साजरे झाले पाहिजे असा माझाही आग्रह आहे. पण आपल्या संस्कृतीने घालून दिलेल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. आपली प्रतिकं जपली पाहिजे. इतर धर्मियांना सुद्धा शिकावेसे वाटेल असे उत्सव साजरे झाले पाहिजे. आपण सर्वानी काळजी घ्यावी आणि विचारपूर्वक अशा उत्सवांचे आयोजन करावे यासाठीच हा शब्दप्रपंच, यातून मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, आपण सगळे मिळून सगळ्यांना अभिमान वाटेल असेच उत्सव साजरे करण्याची सामूहिक जबाबदारी यानिमित्ताने घेऊया”, असे सनी निम्हण म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘हिंदूंनी हिंदूंना मारायचं अन् औरंगजेबाचा विषय चर्चेला आणायचा’; माजी महापौरांचं वक्तव्य
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणारच?, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘चूक ते चूकच’
-आधी चिल्लर फेकली आता शेण फासणार; दीनानाथ रुग्णालयाविरोधात आंदोलक आक्रमक
-रुग्णांकडून लाखोंचे बिल घेणाऱ्या दीनानाथ हॉस्पिटलने थकवली कोट्यवधीचा कर, नेमका आकडा किती?
-‘डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा’, म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चिल्लर फेक