पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपसह काँग्रेस व इतर पक्षांकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार यांच्यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच मोहोळ यांच्या विरोधातील बॅनर्स महापालिका परिसरात लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहे.
मोहोळ यांच्या विरोधात काही मजकूर लिहून हे बॅनर्स पालिका परिसरात लावण्यात आले होते, हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यानंतर लागलीच ते हटवण्यात आले. परंतु लावणाऱ्याने देखील त्याची व्यवस्थित चर्चा होईल याची दक्षता घेतल्याचं दिसत आहे. राजकीय नेत्यांवर टीका करणारे असे “पुणेरी” बॅनर्स लावण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांबद्दल असे पोस्टर लावण्यात आलेले होते. परंतु लोकसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपच्या प्रबळ दावेदारा विरोधातील हे बॅनर्स असल्याने चर्चा झाली नाही तर नवलच.
मोहोळांच्या उमेदवारीची विरोधकांना चिंता की स्वकीयांना धास्ती
भाजपमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात करणारे मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या कामाच्या जोरावर युवा मोर्चापासून पक्षात काम केले आहे. भाजपची पहिल्यांदाच महापालिकेत सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात आले तर लागलीच महापौर पदी काम करण्याची संधी देखील पक्षाकडून मोहोळ यांना मिळाली. आपल्या महापौरपदाच्या काळात कोरोनाच्या महामारीत त्यांनी केलेल्या कामामुळे संपूर्ण शहरात एक वेगळी ओळख निर्माण झाली. तर आज मोहोळ हे प्रदेश भाजपचे सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. मोहोळ यांच्या सारखा उमेदवार लोकसभेसाठी दिल्यास हमखास विजयी होण्याची शक्यता असल्याने भाजप पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावाला पसंती दिली जात असल्याची चर्चा आहे.
मोहोळ यांचे लोकसभा उमेदवार म्हणून नाव निश्चित मानले जात असतानाच आज लागलेले बॅनर हे विरोधी पक्षातील नेत्यांनी लावलेले डोके आहे, की मोहोळ यांची वाढती लोकप्रियता, पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीवर असणारी पसंती, यामुळे भाजपमधीलच एखाद्या इच्छुकाने केलेला हा “कार्यक्रम” आहे? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘भाजप भ्रष्ट जुमला पक्ष, निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील’; सुप्रिया सुळेंची जहरी टीका
-‘ज्या २२ आमदारांचा उल्लेख केला त्यातली २ तरी जाहीर करा’; सुनिल शेळकेंचे रोहित पवारांना आव्हान
-महापालिका उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल; कारवाई होण्याआधीच रोख रकमेसह फरार
-बारामतीतून लढण्यावरून सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “उमेदवार म्हणून माझंच नाव…”
-पुणे काँग्रेमध्ये “लेटर बॉम्ब”चा झटका, लोकसभा उमेदवारीवरून आबा बागुलांचा इच्छुकांना दणका