पुणे : अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. अवघ्या महाराष्ट्रासह परदेशातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पुण्यातही शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडतो. शहरात लाठीकाठी, तलवारबाजी, शिवराजांच्या आयुष्यावर आधारित देखावे सादर केले जातात. अशातच विशेष बाब म्हणजे कोंढवा परिसरातील मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वधर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मुस्लिम समाजातील युवक, महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी केले आहे.
बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असणारा भाग म्हणून कोंढाव्याला ओळखलं जातं. आज मुस्लिम समाज आणि हिंदू समाज एकत्र येऊन या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन आज महाराष्ट्राला घडवून दिले आहे. एक आदर्श राजा सर्व धर्मियांना समान न्याय देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मुस्लिम मावळे आहोत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दरवर्षीप्रणाणे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन करुया आणि त्यांच्या विचारांना उजाळा देऊया. शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभावाचे विचार समजापर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे मत यावेळी मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-तानाजी सावंतांना धक्का; फडणवीसांच्या एका आदेशात सरकारी सुरक्षा हटवली
-पुणे पालिकेत ‘भाजप केंद्रित’ अंदाजपत्रक?; महाविकास आघाडीचा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
-Pune GBS: पुण्यात जीबीएस आजाराच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू; रुग्णसंख्या किती?