पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजप १३२, शिंदेंची शिवसेना ५७, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांने ४१ आणि इतर घटक पक्षांचे ४ असे एकत्रित २३५ जागा जिंकल्या आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आले आहे. विरोधी पक्षदेखील आता या सरकारमध्ये नसणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता महात्मा फुले वाडा पुणे येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारपासून आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे.
‘आज देशात लोकशाहीचे अक्षरशः वस्त्रहरण सुरू झाले आहे. त्याविरोधात राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांनुसार ३ दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन करत आहे. आता नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. हे करूनही गरज भासल्यास या सरकारविरोधात सत्याग्रह करावा लागेल’, अशी टीका डॉ. बाबा आढाव यांनी केली.
अदानींचे प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशातून त्यांना पाठिंबा दिला. या प्रकरणाची संसदेत वाच्यताही होऊ नये म्हणून जे चालले आहे ते लांछनास्पद आहे. विधानसभा निवडणुकीत सरकारी पैशाचा खुळखुळा वाजला. जनतेने या पैशाला भुलू नये. मतदानानंतर मतदानाच्या आकडेवारीमध्ये सतत बदल होतात. त्यामुळे ईव्हीएमबाबत शंका घेण्यास जागा आहे आणि ती रास्त आहे. हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केले जात आहेत. मुस्कटदाबीच्या विरोधात समाजातील जागरूक वर्गाने बोलले पाहिजे. एकटा माणूसही बोलू शकतो ही लोकशाहीची शक्ती आहे, असेही बाबा आढाव म्हणाले आहेत. बाबा आढाव यांनी केलेले हे उपोषण ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज्यात ‘या’ दिवशी होणार सत्तास्थापन! महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला!
-एकनाथ शिंदे मन मोठं करून भाजपला मुख्यमंत्रिपद देतील; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
-निवडणूक झाली तरीही काँग्रेसमधला वाद काही संपेना! काँग्रेस भवनात नेत्यांमध्ये नवा वाद
-‘पुण्याचे पालकमंत्री अजितदादाच’; कोणाच्या गळ्यात पडणार पालकमंत्रिपद माळ?
-पोर्शे कार प्रकरण: अपघात प्रकरणी आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर