पुणे : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होताना दिसत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी आता हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर काँग्रेसमध्येही नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ७ विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना वगळण्यात आले असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
वडगाव शेरीसाठी बाळासाहेब शिवरकर, कोथरूडसाठी सुनील शिंदे, शिवाजीनगरसाठी अविनाश बागवे, पर्वतीसाठी संजय बालगुडे, पुणे कॅन्टोन्मेंटसाठी दीप्ती चौधरी आणि हडपसरसाठी सुनील यादव यांची नियुक्ती झाली आहे. विशेषतः कसबा मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र, या नव्या संघटनेत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना स्थान न दिल्याने चर्चा रंगल्या आहेत.
कसब्यातील पोटनिवडणुकीत विजय मिळवणाऱ्या धंगेकरांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. गेल्या काही दिवसांपासून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. नुकतीच त्यांनी शिंदे यांची भेट देखील घेतली होती, मात्र आपण काँग्रेससोबतच राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. या सर्व राजकीय घडामोडीमध्ये आता काँग्रेसकडून नव्याने करण्यात आलेल्या कमिटीत धंगेकरांना वगळण्यात आल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले की, निरीक्षकपदी निवडणूक न लढणाऱ्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे, तर धंगेकर भविष्यात निवडणूक लढवू शकतात. मात्र, इतर निरीक्षकही महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने धंगेकरांवर वेगळा नियम लावला का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-गजा मारणे टोळीची दहशत, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या माणसाला मारहाण; पुण्यात नेमकं चाललंय काय?
-पालिकेचे पाणी पिण्यास योग्य नाहीच! तपासणीतून कोणती माहिती समोर आली?
-हाय सिक्युरटी नंबर प्लेटचं गौडबंगाल! सामान्यांना हजारोंचा भुर्दंड कशासाठी?