पुणे : राज्याचं राजकारण सध्या औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलंच तापल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे मोठा हिंसाचार पहायला मिळाला. नागपूमध्ये झालेल्या आंदोलनाने दंगलीचे रुप धारण केले. त्यानंतर आता अशा प्रकारची कोणतीही घटना राज्यात इतर ठिकाणी घडू नये म्हणून राज्य सरकार महत्वाची पाऊले उचलत आहेत. असा अनुचित प्रकार पुणे जिल्ह्यात घडून नये तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिनांक २२ मार्च रोजी मध्यरात्रीपासून ते दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
कदम यांनी जारी केलेल्या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे, अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका आणि् शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च्य घोषणा देणे, वाद्य वाजवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दत्ता गाडेच्या वकिलाचे खरंच अपहरण? ‘त्या’ सीसीटीव्ही फूटेजमधून धक्कादायक माहिती समोर
-मोठी दुर्घटना! पुण्यातील हिंजवडीत टेम्पोला आग; चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत
-दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा-
-सोशल मीडियावर मैत्री पडली महागात; ६ जणांनी बोलावून घेतलं, त्याचे नग्न व्हिडिओ, फोटो काढले अन्…
-स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण करुन मारहाण, नेमकं कारण काय?