पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी सत्र सुरुच आहे. नुकतेच स्वारगेट बस स्थानकावर एका नराधमाने २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली. अशात आता पीएमपीएमएलच्या आगार व्यवस्थापकाने महिला वाहकाशी अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावरुन सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात महिला असुरक्षित असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
सुनील धोंडिबा भालेकर (वय ४४ ,रा. चऱ्होली), संजय कुसाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला वाहकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आगार व्यवस्थापकाविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आपल्या तक्रारीची दखल न घेतल्याने महिलेने आगार व्यवस्थापकाच्या केबिनमध्ये जाऊन अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पीएमपीत २०१८ पासून वाहक म्हणून काम करत आहेत. पीएमपीच्या पुणे स्टेशन आगारात त्या नियुक्तीस होत्या. आगारात काम करत असणाऱ्या सुनील भालेकर याने पीडित महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. भालेकर महिलेचा पाठलाग केला. याबाबत महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर भालेकर याने महिलेला तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले. त्याने तिला शिवीगाळ करत मारहाण केली.
पीएमपीएमएलकडून याप्रकरणाची खात्याअंतर्गत चौकशी झाली. भालेकर याची नरवीर तानाजीवाडी आगारात बदली करण्यात आली. महिलेने आगार व्यवस्थापक संजय कुसाळकर याने त्रास दिल्याचा आरोप करून बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. बंडगार्डन पोलीस ठाण्यात तिला तक्रार अर्जाच्या चौकशीच्या अनुषंगाने तिला बोलाविण्यात आले होते. तिच्याबरोबर दोन मित्र होते. चौकशीनंतर महिला मित्रांसोबत एका उपाहारगृहात नाश्ता करण्यासाठी गेली. तेथे भालेकर आला. त्याने पुन्हा अश्लील वर्तन केले. कुसाळकर यांच्याविरुद्ध तक्रार कशी केली, अशी विचारणा करुन त्याने तिला धमकावले. तिने पुन्हा पोलिसांकडे तक्रार दिली, तसेच राज्य महिला आयाेगाकडे तक्रार दिली. या घटनेनंतर कुसाळकर याने महिला वाहकाला निलंबित केले.
दरम्यान, स्वारगेट बसस्थानकावरील २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार आणि महिला वाहकाशी पीएमपीएमएल आगार व्यस्थापकाची वागणूक यावरुन पुण्यात महिला अद्याप असुरक्षित असून महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याची मुजोरी, जन्मदात्या आईला केली मारहाण, नेमकं प्रकरण काय?
-गुंडगिरीला वैतागले कोथरुडकर; चौकाचौकात बॅनरबाजी, काय आहे बॅनरवर?
-पुण्यातील टोळीचा म्होरक्या, कुख्यात गुंड गजा मारणेनं गुन्हेगारीला सुरवात कशी केली?
-नीलम गोऱ्हेंविरोधात आंदोलन करणाऱ्या महिला शिंदेसेनेत जाणार! नेमकं कारण काय?