पुणे : कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या फलकमुक्त कसब्याच्या निर्धाराला पाठिंबा देत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजप कार्यकर्त्यांना अनधिकृत फ्लेक्स लावू नये, असे आवाहन केले आहे. ते कसबा मतदारसंघात संपन्न झालेल्या ‘स्वच्छता नारायण महापूजा’ कार्यक्रमात बोलते होते.
स्वच्छतेचा जागर सुरू ठेवत कसबा मतदारसंघात ‘स्वच्छता नारायण महापूजा’ हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
“हेमंत रासने यांनी स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. त्यामुळे त्यांचे अभियान निश्चितच यशस्वी होईल याची मला खात्री आहे”, असे म्हणत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आमदार हेमंत रासने यांनी कसबा मतदारसंघात कोणताही अनधिकृत फलक लावला जाणार नाही, असा निश्चय केला आहे. याच संकल्पनेची अंमलबजावणी करत शनिवार पेठेतील अनधिकृत फ्लेक्स रासने यांच्या हस्ते हटवण्यात आला. कसबा विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या अनधिकृत फ्लेक्सवर पुढील आठ दिवसात कारवाई करावी अशा सूचना रासने यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा अभियानांतर्गत उपक्रमांतर्गत रमणबाग प्रशालेजवळील बंद करण्यात आलेल्या क्रॉनिक स्पॉटवर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साफसफाईच्या वस्तूंची विधिवत पूजा करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने कसबा मतदारसंघातील २६ क्रॉनिक स्पॉट्स यशस्वीरीत्या बंद करण्यात आले असून, त्या ठिकाणी ‘स्वच्छता नारायण महापूजा’ करण्यात आली. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
या कार्यक्रमास पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. राजेंद्रजी भोसले, घनकचरा व्यवस्थापन विभागचे उपआयुक्त संदीप कदम, पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल तसेच कसबा मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; राज्य परिवहन मंत्री मिसाळ काय म्हणाल्या?
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: फरार आरोपीचा फोटो व्हायरल, भावाला घेतलं ताब्यात