पुणे : पुणे शहरात गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीचा आकडा वाढतच होता. अशातच आता थेट विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांचे अपहरण केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील हडपसर भागातील फुरसुंगी फाटा येथे सोमवारी सकाळी हा सर्व प्रकार घडला आहे. अपहरण करणाऱ्या आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके आहेत.
सतीश सातबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी, सासवड-पुणे रस्ता, हडपसर) हे सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घरातून फिरायला बाहेर पडले. त्यावेळी मोटारीतून आलेल्या चार ते पाच जणांनी वाघ यांना धमकाविले. वाघ यांना धमकावून मोटारीत बसवून अपहरणकर्ते सासवड रस्त्याने पसार झाले. त्यावेळी तेथून निघालेल्या एकाने ही घटना पाहिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास वाघ हे सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले असताना चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून आलेल्या चार जणांनी त्यांचे अपहरण केले. त्यांनी जबरदस्तीने सतीश वाघ यांना गाडीत बसवून पोबारा केला. ही गाडी सोलापूरच्या दिशेने गेली असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. वाघ यांचे अपहरण का झाले, तसेच त्यांचे कोणाशी आर्थिक व्यवहार किंवा वैमनस्य होते का? याबाबतचा अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘…तेव्हा कसं गारगार वाटायचं अन् आता…; पहिल्याच भाषणात अजित पवारांनी घेतला विरोधकांचा समाचार
-‘मी पुण्याचाच, यावर शिक्कामोर्तब’; चंद्रकात पाटलांचं टीकाकारांना प्रत्युत्तर
-बावधनमध्ये खासगी स्टुडिओला भीषण आग; आगीवर नियंत्रण पण स्टुडिओ जळून खाक