पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकाराच्या निषेधार्थ भाजपच्या पुण्यातील महिला कार्यकर्त्यांनी डॉ. घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली आहे. या प्रकारानंतर भाजपमध्ये वाद सुरु असल्याचे पहायला मिळाले आहे. महिला कार्यकर्त्यांनी रुग्णालयाची तोडफोड केल्यानंतर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र पाठवून याबाबत नाराजी कळवली होती. मेधा कुलकर्णींच्या पत्रावर धीरज घाटेंनी देखील ‘हे विषय पक्षाच्या बैठकीत बोलायचे असून असं माध्यमांमध्ये हे विषय बोलणे चुकीचे आहे’, असे सांगितले होते. यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते.
या पार्श्वभूमीवर भाजपची मंगळवारी शहर पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह अन्य नेते मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाचे समर्थन करण्यात आले.
‘महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन त्यांच्या घरातील प्रश्नासाठी नव्हते, तर संघटनेसाठी केलेले आंदोलन होते. आंदोलन करताना ते चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असले, तरी कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करणे बरोबर नाही’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
“१९ वर्षांपूर्वी आंदोलन करताना माझ्याकडून देखील तोडफोड झाली होती, ती चुकीचीच होती. मात्र, कार्यकर्ता म्हणून पक्ष माझ्यासोबत राहिला. आपल्या पक्षातील नेता चुकीचे सांगत असेल, तर तुम्ही चुकीचे बोलत आहे स्पष्टपणे सांगायला हवं, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत. त्यामुळे मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांची बाजू घेतल्याचे पहायला मिळाले तर मेधा कुलकर्णींनी मात्र नाराजी व्यक्त केल्याचे पहायला मिळाले आहे.
पक्षाची बैठक सुरू होण्यापूर्वी खासदार मेधा कुलकर्णी बैठकच्या ठिकाणी उपस्थित होत्या. मात्र, चंद्रकांत पाटील आणि त्या पाठोपाठ मुरलीधर मोहोळ बैठकीला आल्यानंतर त्यांची भाषणे होण्याआधीच खासदार कुलकर्णी बैठक अर्धवट सोडून निघून गेल्याचं समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘अनामत रक्कम घेण्याचा रुग्णालयांना अधिकार’; इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठकीत भूमिका
-‘४० लाख रुपये भरा अन् मृतदेह घेवून जा’; २६ वर्षे रुग्णसेवा केलेल्या डॉक्टरसोबतही ‘दीनानाथ’ची वागणूक
-दीनानाथ रुग्णालयाला पालिकेचा कर भरावाच लागणार; पालिकेने बजावली वसुलीसाठी नोटीस
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण: आरोग्य विभागानं ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर केली मोठी कारवाई
-‘३५ वर्षांपूर्वी ‘दीनानाथ’ला जागा देऊन आम्ही चूक केली का?’ जागेचे मूळ मालक खिलारेंचा उद्विग्न सवाल