पुणे : काही महिन्यांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे राजकीय बैठका, दौरे सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर होते. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच ठाकरेंच्या ५ माजी नगरसेवकांनी पक्षाला राम राम करत भाजपचा झेंडा हाती घेतला. पक्षाची वाताहत थांबवण्यासाठी खासदार राऊतांनी आज पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत देखील मानपानावरुन नाराजीनाट्य पाहायला मिळाले आहे.
संजय राऊत, सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या बैठकीतून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे निघून गेल्याचे पहायला मिळाले आहे. बैठकीला माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना माजी नगरेसवक पृथ्वीराज सुतार यांच्या शेजारी बसवले होते. मात्र, कोथरुड विधानसभा निवडणुकीत झालेल्या अंतर्गत वादामुळे मोकाटे यांचा सुतार यांच्याबाबात आक्षेप होता म्हणूनच ते बैठकीतून निघून गेल्याची माहिती मिळत आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेत उरलेल्या नेत्यांपैकी चंद्रकांत मोकाटे हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत मोकाटे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आहे. ‘सुषमा अंधारे या बैठक ठिकाणी पोहोचल्यावर त्यांना मंचावर बसायला जागा नव्हती. मी माझी खुर्ची त्यांना दिली आणि माझं निघून आलो. त्या आमच्या नेत्या आहेत त्या मंचावरचं बसणार ना’, असं म्हणत बैठकीतून निघून जाण्याचं कारण दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या विश्वासू नेत्याची मुजोरी; अद्याप अटक नाही, अजित पवार म्हणाले…
-पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब