पुणे : राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या या संदर्भात आमदार हेमंत रासने यांनी प्रभावीपणे आवाज उठवत लक्षवेधी सूचना आणि प्रश्न मांडले. विशेषतः कसबा मतदारसंघासह पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला चालना देणाऱ्या दोन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गांच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी त्यांनी लक्षवेधी सूचना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर भुयारी मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी रस्त्यावर शनिवारवाडा ते स्वारगेट आणि बाजीराव रस्त्यावर सारसबाग ते शनिवारवाडा असे दोन भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर भुयारी मार्गांच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
शहरातील ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा परिसरात पुरातत्त्व विभागाच्या नियमावलीमुळे निर्माण झालेला जुन्यावाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा करणे. खडकमाळ आळी येथील संथगतीने सुरू असणारे नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘आपला दवाखाना’ योजना कसबा मतदारसंघासह पुणे शहरामध्ये राबवणे, खडक येथील ब्रिटिशकालीन पोलीस वसाहतीचे पुनर्निर्माण, महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची दुरावस्था झाल्याने त्यांना अडचणींचा सामना करत राहावे लागत आहे, त्यामुळे वसाहतींची डागडुजी करण्यासोबतच नवीन इमारतींच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याची लक्षवेधी सूचना रासने यांच्याकडून करण्यात आली.
मतदारसंघातील जुन्यावाड्यांचा पुनर्विकास तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील याबद्दलचे सविस्तर निवेदन देत स्वतंत्र गृहनिर्माण धोरण राबवण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. कसबा पेठ १२७८ येथील एसआरए प्रकल्पाच्या जागेवर वक्फ बोर्डाकडून करण्यात आलेल्या दाव्यामुळे रखडलेले बांधकाम तसेच स्थानिकांना गेली ५० महिन्यांपासून भाडे दिले जात नसल्याची लक्षवेधी सूचना सभागृहात चर्चेला आली, यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी शासनातर्फे पूर्ण दखल घेऊन स्थानिक रहिवाशांवर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.
बेकायदेशीरपणे पुणेकरांना वेठीस धरत मेट्रो स्टेशनवर करण्यात आलेले आंदोलन, तसेच हिंजवडी येथे मिनी बसला आग लागून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत मांडत शासनाकडून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली.
ससून रुग्णालयामध्ये यंत्रणेच्या कमतरतेमुळे ओपीडी केस पेपर काढण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे अनेक रुग्णांना उपचाराविना परत जावं लागते. तसेच, काही महागडी औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना ती बाहेरून विकत घ्यावी लागतात हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. तसेच पुणे शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांचा मुद्दा मांडतानाच कसबा मतदारसंघातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून महापालिकेला आदेश देण्याची सूचना आमदार हेमंत रासने यांनी मांडली.
अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर घेण्यात आलेल्या चर्चेत सहभाग नोंदवत मतदारसंघातील विकास कामांना निधी देण्याची मागणी केली, तसेच राज्याच्या उत्पन्नामध्ये कशा पद्धतीने वाढ करता येऊ शकते? याबद्दलची भूमिका सभागृहात मांडली. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्र विधानसभेत एकमुखाने संमत झाला, याचा मला अत्यंत आनंद आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील भिडेवाडा येथे फुले दांपत्याने देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि त्यांचे वास्तव्य असलेला समाजसुधारणेचे प्रतीक असणारा फुले वाडा येथेच असल्याने या भूमीचा लोकप्रतिनिधी म्हणून, या शिफारशीचे मनःपूर्वक स्वागत करतो, असं हेमंत रासने यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आपलं नपुंसकत्व लपवण्यासाठी मित्रालाच आणलं घरी अन्…. पुण्यातील धक्कादायक प्रकार
-मुख्यमंत्री अन् सरकार काय बोळ्याने दूध पितात का? अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण?; उदयनराजे आक्रमक
-‘असा चमत्कार झाला तरच नमस्कार होणार’; विजय शिवतारेंनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान
-‘बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही’- अजित पवार
-विधानसेभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड, मात्र आता आमदारकी धोक्यात; नेमकं कारण काय?