विरेश आंधळकर (पुणे) : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी १ लाख 23 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मोहोळ यांच्या विजयात कोथरूडसह पर्वती आणि कसबा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. मोहोळ यांना खासदारकीच्या शुभेच्छा देतानाच भाजपमधील नेत्यांचे महापालिका आणि विधानसभेचे फोटो असलेले बॅनर्स शहरात झळकू लागले आहेत. त्यामुळे लोकसभेचा निकाल लागताच आता इच्छुकांनी पालिका आणि विधानसभेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचं पहायला मिळत आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना तब्बल 29 हजारांचे मताधिक्य मिळाले. येथे माधुरी मिसाळ विद्यमान आमदार असून भाजपचे अनेक नगरसेवक देखील याच मतदारसंघातून येतात. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काम करत असताना अनेकांचे विधानसभा निवडणूक लढवण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. यामध्ये प्रामुख्याने पर्वती मतदारसंघात माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. मोहोळ यांना शुभेच्छा देणारे शेकडो बॅनर्स भिमाले यांच्या वतीने उभारण्यात आले असून यावर विधानसभेचा फोटो छापत त्यांनी एक प्रकारे आपणही मैदानात असल्याचं जाहीर केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत श्रीनाथ भिमाले यांना पुणे मतदारसंघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली होती. या माध्यमातून त्यांनी प्रचारामध्ये सक्रिय सहभाग नोंदवतानाच पक्षीय यंत्रणेत महत्त्वाची भूमिका निभावली. गेल्या अनेक वर्षांपासून भिमाले पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत आहेत. 2017 मध्ये पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांची सभागृह नेते पदी वर्णी लागली होती. पर्वती विधानसभा हा मिसाळ कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता भाजपमधूनच येथे इच्छुकांची संख्या वाढू लागल्याने आगामी काळामध्ये काय राजकारण रंगणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-प्रतिक्षा संपणार! येत्या ५ दिवसात महाराष्ट्रातील ‘या’ भागांत मुसळधार पावसाचा इशारा
-काका अजित पवारांपुढे पुतण्या दंड थोपटणार, बारामतीत मोर्चेबांधणीला सुरुवात? युगेंद्र पवार म्हणाले…
-रासनेंनी चॅलेंज पूर्ण केलं.. धंगेकरांचा कसब्यातच करेक्ट कार्यक्रम! नेमकं काय घडलं?
-“दादांना सांगा ताई आली” असं म्हणत शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं