पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय खेळी खेळण्यास सुरवात केल्याचे दिसत आहे. पुण्यातील मोदी बागेत आज सकाळपासून शरद पवारांच्या भेटीगाठी सुरु आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातले अनेक नेते शरद पवार भेटून गेले आहेत. आज भोसरी विधानसभा मतदारसंघाचे ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे नेते रवी लांडगे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे.
भाजपमधून नुकतेच ठाकरे गटात प्रवेश केलेले रवी लांडगे हे भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे या जागेवर शरद पवारांच्या देखील राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित गव्हाणे यांनी देखील तयारी सुरु केली आहे. त्यामुळे रवी लांडगे यांच्या पवारांच्या भेटीमुळे भोसरीत नवा संघर्ष उभा राहिण्याची शक्यता आहे.
‘मी पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. भोसरी मतदारसंघ माझा दोन वेळा फिरून झाला आहे. ही जागा शिवसेनेकडे आहे आणि मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण जागा कुणालाही सुटली तरी मी एक निष्ठेने काम करेल असं मी पवार साहेबांना बोललो आहे. तर, आखाडा भोसरीचा असला तरी पैलवान कोणीही असू द्या वस्ताद आमच्याकडे आहे. पिंपरी चिंचवडमधील नगरसेवक त्यांच्या कामासाठी पवारांना भेटण्याकडे आले आहेत’, असे रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीनंतर म्हणाले आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी देखील पवारांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. विलास लांडे हे देखील आज शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदी बाग या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी आपला डाव टाकायला सुरुवात केली आहे. मात्र, मविआतील दोन्ही पक्षांच्या दाव्याने नवा संघर्ष उभा राहिला आहे. त्यामुळे शरद पवार याच्यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात नेमकं काय सुरुय? भारती विद्यापीठ परिसरात ५६ लाखांची अफू जप्त
-हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त टळणार? राष्ट्रवादीची ‘तुतारी’ फुंकण्याला कार्यकर्त्यांचा विरोध
-मावळात ‘महाआरोग्य’ शिबिराला उदंड प्रतिसाद! आमदार शेळकेंच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक
-हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी घेणार मोठा निर्णय