पुणे : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेला सर्वच पक्षांमध्ये वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप देखील अंतिम टप्प्यात आले असून लवकरच पक्षांकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये आता कसब्यातून ब्राह्मण समाजातील नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी करणारे पत्र काही संघटनांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे पत्र म्हणजे इच्छुकांकडून जातीय कार्ड खेळत दबावतंत्र वापरले जात असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी रासने यांच्यासह शहराध्यक्ष धीरज घाटे, कुणाल टिळक, स्वरदा बापट आदी इच्छुक आहेत. कसबा मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची संख्या मोठी असल्याने येथून समाजातील उमेदवार देण्याची मागणी करण्यात येत आहे. सकल ब्राम्हण समाजाचे समन्वयक भालचंद्र कुलकर्णी यांच्या माध्यमातून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने कायम हिंदुत्वाची कास धरली आहे, हे करताना या दोन्ही पक्षांनी सर्वसमावेशक धोरण अवलंबताना ब्राह्मण समाजाला देखील प्राधान्य दिलं आहे. नुकतेच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ देखील सरकारने स्थापन केले असून महाराष्ट्रातील ब्राह्मणबहुल ३० विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी देखील या माध्यमातून करण्यात येत आहे.
कसबा मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये धीरज घाटे, कुणाल टिळक आणि स्वरदा बापट हे ब्राह्मण समाजातून तर हेमंत रासने हे कासार समाजातील आहेत. पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर रासने यांनी गेली १८ महिन्यांमध्ये मतदारसंघात संघटना बांधणीसोबतच जनतेमध्ये जात काम करण्यावर भर दिला. या माध्यमातून त्यांनी आपले वलय कसब्यामध्ये निर्माण केलं आहे. दुसरीकडे उमेदवारी मिळविण्यासाठी घाटे यांच्यासह टिळक, बापट हे देखील इच्छुक आहेत. आपल्या समाजातील नेत्याला उमेदवारी मिळवून देण्यासाठी काही ब्राह्मण संघटना पुढे आल्या आहेत. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.
राज्यभरात भाजपची ओबीसी समाजाला साद
मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण ढवळून टाकले आहे. जरांगे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे. तर दुसरीकडे जरांगे फॅक्टरमुळे मराठा समाज भाजपपासून दुरावल्याचे चित्र आहे, याची प्रचिती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील आली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून ओबीसी समाजाला सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आजवर महाराष्ट्रातील ओबीसींनी भाजपला कायम साथ दिली. या परिस्थितीमध्ये आता कसबा विधानसभा मतदारसंघात ब्राम्हण उमेदवाराची मागणी केली जात असल्याने राज्यभरात वेगळा संदेश जात आहे. काही निवडक संघटनांच्या दबावतंत्राच्या खेळीपुढे भाजपने झुकते घेतल्यास राज्यभरात बहुजन समाजामध्ये वेगळा संदेश जाण्याची शक्यता देखील राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-खडकवासल्यात राजकीय राडा; महायुतीच्या सेना-भाजपचे इच्छुक आमने-सामने, अन् पुढे काय घडलं?
-चाकणकरांना पुन्हा मिळालं महिला आयोगाचं अध्यक्षपद; दादांच्या राष्ट्रवादीत वादाच ठिणगी
-Assembly Election: अखेर जानकरांनी दोर तोडले; भाजपला रामराम करत महायुतीतून एक्झिट
-‘तुमच्याच घरामध्ये पद वाटणार असाल तर…’ विधान परिषदेला डावलल्याने दीपक मानकर आक्रमक
-आचारसंहिता लागू झाली तरीही पुण्यात राजकीय पोस्टरबाजी कायम; कारवाईस टाळाटाळ