पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून २८८ पैकी २३५ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे विधानसभेत आता विरोधी पक्षच नसणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा फुले वाड्यात आंदोलन तसेच आत्मक्लेष उपोषण केले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेत त्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी शरद पवारांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यासंबंधीची अस्वस्थता संपूर्ण राज्यात दिसत आहे. निवडणुकीत झालेली अनियमितता पाहून बाबा आढाव यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत झालेला सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता. स्थानिक निवडणुकांत अशा घटना ऐकायला मिळतात. पण राज्याच्या निवडणुकात असे चित्र कधी पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत लोकांमधून उठाव होण्याची आता गरज आहे’, असे शरद पवार म्हणाले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसत आहे. यातून देशाच्या लोकशाहीवर होणारे दूरगामी विपरीत परिणाम लक्षात घेऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष उपोषणाची भूमिका घेतली. पुणे येथील महात्मा फुले वाड्यात होणाऱ्या या… pic.twitter.com/PFTAGb05Pe
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 30, 2024
“काही लोकांनी ईव्हीएम कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते. आमची कमतरता होती की, आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल, असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोग या संस्थेवर संशय व्यक्त केला नाही. पण निकालानंतर आता तथ्य दिसत आहे. राज्यातील २२ उमेदवारांनी फेरमतमोजणी करण्यासाठी अर्ज केला आहे. यातून काही साध्य होईल का? याबाबत मला शंका वाटते”, असंही शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्रिपदाबाबतच्या ‘त्या’ चर्चेचा मुरलीधर मोहोळांनी केला खुलासा
-‘कोणत्याही पदाची जबाबदारी दिली तरी…’; सुनील शेळकेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
-पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या विजयी आमदारांची चंद्रकांत पाटलांनी घेतली सदिच्छा भेट
-‘गरज भासल्यास या सरकारविरोधात सत्याग्रह’; डॉ. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण