पुणे : मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन सर्वच स्तरावरुन निषेध नोंदवण्यात येत होता. विविध संघटना त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नसल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
“अमितेश कुमार यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसेल. तो माहीत करून घेण्यासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके पाठवणार आहे. अमितेश कुमार यांनी एक प्रकारे राहुल सोलापूरकर यांना दिलेली क्लीन चीट ही देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखीच आहे. अमितेश कुमार यांची तक्रार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडे करणार आहे”, असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
“अमितेश कुमार हे आयुक्त आहेत म्हणजे त्यांना इतिहास माहितच आहे असं नाही. आयुक्तपदी असणाऱ्यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे दोन्ही महापुरुषांचा अपमान आहे. यावरुन सोलापूरकर जितके दोषी तितकेच अमितेश कुमारही दोषी आहेत. डॉ. बालकृष्णन यांनी अस्सल शिवचरित्र लिहलं त्यामध्ये शिवरायांची आग्र्याहून कशी सुटका झाली तो प्रसंग अमितेश कुमार यांनी वाचावा आणि त्याच्याकडे पुस्तक नसेल तर आम्ही पाठवतो. त्यानंतर त्यांनी ठरवावं सोलापूरकर बरोबर की चूक”, असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
छत्रपती शिवरायांना, डॉ. आंबेडकरांना मानणारा पुरोगामी महाराष्ट्र असून अशा आरोपींना आपण क्लिन चीट देत असाल तर आमच्यासारखे अनेक लोक जिवंत आहेत. आम्ही कसलीही पर्वा करणार नाही. इतिहासकारांनी लिहलेली शिवचरित्र वाचा आणि मग ठरवा. तुम्ही जाणीवपूर्वक सोलापूरकरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर अजित पवारांकडे तक्रार करणार आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-RTO: ३१ मार्चपूर्वी गाडीच्या नंबर प्लेटमध्ये करावा लागणार ‘हा’ बदल, अन्यथा…
-पुण्यात GBSच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू; रुग्णांची संख्या 200 पार
-येरवडा-कात्रज प्रवास होणार सुसाट; ‘ट्वीन टनल’च्या निर्मितीला हिरवा झेंडा
-फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी मेट्रो इंटिग्रेटेड ई-बाइक फीडर सेवा ‘या’ १० स्टेशनवर सुरु
-‘ताबडतोब महाराष्ट्राची माफी मागा’; संजय राऊतांंच्या ‘त्या’ टिकेवरुन मनसे आक्रमक