पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव भागात असलेल्या काशीद पार्क जवळ एका बिगारी कामगाराच्या घराला भीषण लागल्याची घटना समोर आली आहे. पिंपळे गुरव येथील काशीद पार्क जवळील बिगारी कामगारांच्या पत्र्याच्या झोपडपट्टीत आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये कामगारांचे लाखो रूपयांची रोकड आणि सोने जळून खाक झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
या भागात दाट लोकवस्ती असल्यामुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. या भीषण आगीला २० मिनिटांत आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
बिगारी कामगाराने घरात ठेवलेली ५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू या आगीत जळून खाक झाल्या आहेत. तसेच २० पत्र्याची घरे या आगीमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. ५ लाखांच्या रोख रकमेसह ५ तोळे सोन्याचे दागिने असे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तविला आहे.
बिगारी काम करणाऱ्याच्या झोपडीत एवढी रोकड आणि सोन्याचे दागिने कसे आले? यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. करिअप्पा गुंडापुर या मुकादमाची ही झोपडी होती. त्याला सेन्टरिंगच्या ठेकेदारांनी हे पैसे दिल्याचे सांगण्यात येत आहे. बाणेरचे विठ्ठल पन्हाळे आणि हिंजवडीचे गजानन गदाडे अशी पैसे दिलेल्या ठेकेदारांची नावे आहेत. पण या दोघा ठेकेदारांनी एवढी रक्कम कोठून आणली आणि या बिगाऱ्याकडे का दिली याचा तपास आता सांगवी पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार-शरद पवार एकत्र येणार?; दत्तात्रय भरणे म्हणाले…
-पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेची तयारी; ‘किती गेले नी किती राहिले’ची चाचपणी
-महापालिकेकडून नागरिकांच्या जीवनाशी खेळ, शुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा; जीबीएसचा प्रादुर्भाव वाढला
-आधी बंद दाराआड चर्चा अन् नंतर शेजारी बसणं टाळलं; पवार काका-पुतण्याच्या मनात नेमकं काय?