पुणे : गेल्या २-३ वर्षांपूर्वी जगभरात कोरोना विषाणूने चांगलाच हाहाकार माजवला होता. या कोरोनाच्या महामारीमध्ये कोट्यावधी लोकांचा जीव गेला. कोरोनाच्या महाप्रलयातून गेल्या २ वर्षांत सावरत आहे तोच पुणे शहरात आता दुर्मिळ आजाराने डोकेदुखी वाढवली आहे. पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ या न्यूरोलॉजिकल आजाराचे संशयित रूग्ण आढळून आले आहेत. पुणे महानगरपालिका हद्दीतील ६ खासगी रुग्णालयांमध्ये २४ संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. त्यापैकी ८ रुग्णांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. तर २ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. सर्वांत कमी वयाचा रुग्ण २ वर्षांचा आहे, तर सर्वाधिक वयाचा रुग्ण ६८ वर्षांचा असल्याची माहिती आहे.
‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराची लक्षणे कोणती?
-हाता-पायांमधील ताकद कमी होणे. हाता-पायांना मुंग्या येणे.
-स्नायू कमकुवत झाल्याने वेदना होतात, संवेदना कमी होतात.
-गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे
-धाप लागणे
-श्वास घेण्यास त्रास होणे
-चेहरा, डोळा, छाती, शरिरातील स्नायूंवर परिणाम, तात्पुरता अर्धांगवायू, श्वसनाचा त्रास होतो.
_हाताची बोटं, पायांना वेदना, चालताना समस्या, चिडचिड, चेहऱ्यावर कमजोरी ही प्रमुख लक्षणे आहेत.
आजाराची कारणे काय?
‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ हा विषाणूमुळे होणारा संसर्ग, ऑटो-इम्युन डिसीज, एखादी मोठी शस्त्रक्रिया होणे किंवा मेंदूशी संबंधित आजार, अशा विविध कारणांमुळे ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ हा आजार होऊ शकतो. या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती मज्जातंतूवर आघात करते. त्यामुळे हात-पायांमधील ताकद नष्ट होते आणि शारिरीक हालचालींवर मर्यादा येतात. या आजाराचे निदान करण्यासाठी स्पायनल फ्लुईडची चाचणी केली जाते. यामुळे रुग्णाला अर्धांगवायू (पॅरालिसीस) येऊ शकतो. तीन-चार आठवडे उपचार घेतल्यावर ९५ टक्क्यांहून अधिक रुग्ण बरेही होतात.
दरम्यान, शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये- १०, सह्याद्री (डेक्कन)- १, भारती रुग्णालय- ३, काशीबाई नवले रुग्णालय- ४,पूना हॉस्पिटल- ५ आणि औंधमधील अंकुरा हॉस्पीटलमध्ये १ अशा रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आजाराचे ८ संशयितांपैकी रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्ही पाठविण्यात आले आहे. हा आजार तरुणांमध्ये होत असून या आजाराला जास्त घाबरुन न जाता काळजी घेणं महत्वाचं आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे महापालिकेची निवडणूक कधी होणार? न्यायालयातील सुनावणी संदर्भात महत्त्वाची अपडेट
-वाल्मिक कराड प्रकरणी भाजप नेत्याची सीआयडीकडून चौकशी; ‘तो’ नेता कोण?
-‘काम कमी नखरा जास्त’; शरद पवारांच्या आमदाराची राज्य सरकारवर आगपाखड
-बायको प्रेग्नंट, तरीही नवऱ्याने अविवाहित म्हणत डॉक्टर तरुणीसोबत…; पुण्यात धक्कादायक प्रकार