पुणे: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 12 जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा घ्यावी, अशी लेखी मागणी पुण्यातील शिष्टमंडळाने मुंबईत थेट अजित पवार यांची भेट घेऊन केली आहे. विधानसभा निवडणुक चार महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी परिषदेची एक जागा हवीच आणि ती पुण्याला मिळावी, असा युक्तिवाद पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या २१ जागांपैकी ९ जागा अजित पवार गटाकडे आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असताना देखील लोकसभा निवडणुकीत समाधानकारक कामगिरी पक्षाला करता आलेली नाही. अजित पवार यांचा गड असणाऱ्या बारामतीसह शिरूरमध्ये देखील पक्षाला पराभवाचा सामना करावा लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतःचे आमदार असताना देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना येथून मताधिक्य मिळाले. अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात विरोधी उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मोठे मताधिक्य मिळवले.
पुणे शहरातील हडपसर व वडगाव शेरी या दोन जागांवर मागील निवडणुकीत भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमाकांवर असल्याने जागा वाटपात कदाचित अडचणीत येऊ शकतात, त्यामुळे राजकीयदृष्ट्या विधान परिषदेत पुण्यातून एक आमदार असणे गरजेचे आहे. विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा होत असताना त्याचा फायदा होण्याचा दावा शहर पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.