पुणे: लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील सभा चांगलीच गाजली. यानंतर आता महायुतीची उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मतदार संघामध्ये प्रचार यात्रा काढण्यावर जोर देण्यात आला आहे. मोहोळ यांचे होम ग्राउंड असलेल्या कोथरूडमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाल्याच पाहायला मिळालं. यावेळी बोलताना ‘पुणे शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या चांदणी चौकातील बहुमजली उड्डाणपूल हा येणाऱ्या काळात पथदर्शी ठरेल’ असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला आहे
मोहोळ यांच्या प्रचारार्थ कोथरूड विधानसभेतील भेलकेनगर, गुजरात कॉलनी, आझादनगर, शास्त्री नगर, सुतारदरा, जय भवानीनगर, रामबाग कॉलनी, हनुमाननगर मार्गे मेगा सिटी परिसरात प्रचार फेरीचा समारोप झाला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार संजय काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, मनसेचे नेते किशोर शिंदे, सुधीर धावडे, डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेविका छाया मारणे, वासंती जाधव, अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा पाठक, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील यांचा प्रमुख सहभाग होता.
यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले, “शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी आग्रही मागणी मी महापौर असताना केली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला. त्याच धर्तीवर गतिमान, सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी शहराच्या विविध भागात 21 ठिकाणी उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल किंवा ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहेत. शहराच्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आणि अन्य प्रकल्पांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या तरतुदीतून ही कामे केली जाणार आहेत.”