पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा गुढीपाडवा मेळाव्यात केली होती. देशामध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण पाठिंबा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. या घोषणेनंतर महाराष्ट्रभरामध्ये महायुतीचे उमेदवार आणि मनसैनिकांची मने जुळवण्यासाठी बैठकांचे आयोजन केले जात आहे. आज पुण्यामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शहरातील संघटन मोहोळ यांच्या पाठीशी उभे करणार असल्याचा विश्वास त्यांनी त्यांनी व्यक्त केला आहे.
मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना पुणे शहर कार्यालयात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. याप्रसंगी मोहोळ यांना शुभेच्छा देत अमित ठाकरे यांनीही मनसेची संपूर्ण पुणे शहर संघटना आपल्या प्रचारात सक्रिय असेल, असा विश्वास व्यक्त केला.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मोहोळ म्हणाले, ‘मनसेचे नेते अमितजी ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असताना मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे मताधिक्य वाढवण्यास मोठा हातभार लावतील, असा शब्द दिला. त्यांच्याशी प्रचाराच्या रणनीतीबाबतही चर्चा झाली. त्यामुळे आमचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. मनसेच्या पाठिंब्यामुळे विजय आणखी सोपा झाला आहे. राज ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग आणि मनसेची स्वतंत्र ताकद संपूर्ण पुणे शहरात आहे’.
दरम्यान, मनसे सरचिटणीस वागसकर म्हणाले, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नुकताच महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आमचे नेते अमितजी ठाकरे सर्वच शहरांत जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी आज पुण्यातही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी, सर्व संघटकांशी चर्चा केली. त्यांनी आम्हा सर्वांना सोबत घेऊन, सन्मानाने वागणूक देऊन महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करण्यास सांगितले आहे.
या वेळी मनसेचे नेते बाबू वागसकर, सरचिटणीस रणजीत शिरोळे, सरचिटणीस बाळा शेडगे, सरचिटणीस अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘त्यांना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत’; अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना टोमणा
-Shirur Lok Sabha | ‘हे तर दुसरे संजय राऊत’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा