पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशभरात केलेल्या विकासकामांची कामगिरी ही नागरिकांना पसंतीस उतरणार नाही. त्यामुळे. गेल्या दहा वर्षांमधील कामगिरी पाहता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत, अशी संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य लोकांची भावना आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एक मत देण्याचा निश्चय प्रत्येक पुणेकराने केला आहे. ही देशाची निवडणूक आहे, मोदींची निवडणूक आहे, या दृष्टीने आम्ही पाहत असून विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार आहोत, अशी प्रतिक्रिया पुणे लोकसभा मतदारसंघ ‘महायुती’चे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.
गेल्या आठवड्यामध्येच भाजपकडून मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र काँग्रेसकडून कोण उमेदवार असणार हे स्पष्ट झालेले नव्हतं. आता कसबे चे विद्यमान आमदार रवींद्र धनगरीकर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुण्याच्या मैदानात भाजपचे मोहोळ तर काँग्रेसचे धंगेकर यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. पुण्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आज मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे बोलताना मोहोळ म्हणाले ”पुणेकर सूज्ञ आहेत. पुण्याच्या निवडणुकीचा निकाल देशाचा पंतप्रधान कोण असणार, हे ठरवणार आहे. विधानसभा पोटनिवडणूक आणि देशाच्या लोकसभेची निवडणूक याचे संदर्भ पूर्णपणे वेगळे असतात. आज त्यांच्या पक्षाला जो योग्य उमेदवार वाटला, तो त्यांनी दिला. माझ्या पक्षाला माझे नाव योग्य वाटले म्हणून मला उमेदवारी दिली आहे. महायुतीची आणि महाविकास आघाडीची निवडणूक आहे असे न पाहता मोदींची निवडणूक आहे, या दृष्टीने आम्ही पाहत आहोत.
किती मताधिक्याने निवडून याल? ही निवडणूक एकतर्फी आहे का? असे विचारले असता मोहोळ म्हणाले, ‘एकतर्फी लढाई होणार, हे पुणेकरांनी ठरवले आहे. आपण पत्रकार सर्वत्र फिरत असतात आपणही याचा कानोसा घ्यावा. आकड्यात मी जाणार नाही, भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी पुणेकर उभा राहतील हा विश्वास आहे’.