पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातावरुन शहरासह राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. बिल्डर पुत्र वेदांत अग्रवाल याने अलिशान पोर्शे या कारने बेदरकारपणे, भरधाव वेगाने तसेच मध्यधुंद अवस्थेत कार चालवून दोन तरुणांना चिरडले आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वार दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. हे प्रकरण पुणे पोलीस आयुक्तांकडून दडपले गेल्याचा गंभीर आरोप कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एक्स या मायक्रोब्लॉगिंग (ट्वीटरवरुन) साईटवर धंगेकरांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. “पुणे पोलीस आयुक्तांनी पोर्श अपघात प्रकरणात पैसे खाल्ले आहेत. तपास अधिकाऱ्यांनी त्रुटी केल्या आहेत. या सगळ्या प्रकरणाचा तपास वेगळ्या संस्थेकडे दिला पाहिजे. यामध्ये डिलिंग कुणी केलं? कुठल्या हॉटेलमध्ये झालं? पोलीस आयुक्तांना कसं पाकिट गेलं? याचा तपास झाला पाहिजे. पोलीस आयुक्तांशिवाय हे घडूच शकत नाही”, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
“पोर्शेच्या धडकेत एका तरुणाचा आणि तरुणीचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह शवागारात होते आणि त्यांना धडक देणारा मुलगा आणि त्याचा बाप दोघेही घरी जाऊन आराम करत होते. ही कुठली नीतीमत्ता आहे? पैसे खाल्ल्याशिवाय हे होऊच शकत नाही. आता मी रस्त्यावर येऊन या प्रकरणी वाचा फोडणार” असा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.
“ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी केली, असा पोलीस कमिश्नर आम्हाला नको. या दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या मुलाला कोर्टाने १४ दिवसांची कस्टडी मिळणे हे आपल्या लढ्याला मिळालेले पाहिले यश आहे. जर आपण सर्वांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण दाबले गेले होते. आता खरं या व्यवस्थेतील कचरा साफ करण्याची वेळ आहे. त्याची सुरुवात पोलीस कमिशनर यांच्यापासून करायला हवी”, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! येत्या २ दिवसांत पुन्हा उन्हाचा कडाका वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
-‘पोलीस महानालायक असतातच…’; पुणे अपघातावरुन केतकी चितळे पोलिसांवर संतापली
-ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देणाऱ्या ममता बॅनर्जींना कोलकाता न्यायालयाची चपराक; बावनकुळे म्हणाले,…
-कल्याणीनगर अपघाताचा पुणे वाहतूक पोलिसांनी घेतला धसका; शहरात अनेक भागात नाकाबंदी अन्..