पुणे : पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आहे. या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचे नाव आता समोर आले आहे. मुख्य सूत्रधाराच्या तपासासाठी आता थेट ‘इंटरपोल’ची मदत घेतली जाणार आहे. सीबीआयच्या मदतीने पुणे पोलिसांनी ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावण्याची तजवीज केली आहे.
संदीप धुनिया (रा. पाटणा, बिहार) असे मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. सध्या हा मुख्य आरोपी आखाती देशातील कुवैतमध्ये असल्याची महत्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. या खटल्यासाठी विशेष वकिलांची नेमणूक देखील केली गेली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवला जाणार आहे. दरम्यान, आजवर ३ हजार ५०० कोटींचे साधारण १७६० किलोच्या आसपास ‘एमडी’ ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांनी जप्त केला आहे.
पुणे पोलिसांनी यापूर्वी वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, रा. सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय ४०, रा. विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (वय ४०), युवराज बब्रूवान भुजबळ (वय ४१, रा. डोंबिवली पश्चिम), दिवेश चिरंजीव भुटीया (वय नवी दिल्ली), संदीप राजपाल कुमार (रा. नवी दिल्ली) आणि संदीप हनुमानसिंग यादव (रा. नवी दिल्ली), आयुब अकबरशहा मकानदार (वय ४४, रा. कुपवाड, सांगली) यांना अटक केली आहे.
आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुनिया हा मूळचा भारतीय असला तरी त्याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. त्याला ‘डीआरआय’ने २०१६ साली कारवाई करीत १५० किलो ‘एमडी’ जप्त केले होते. त्यावेळी ‘डीआरआय’ने यातील आरोपी विपिन कुमार याला पुण्यामधून अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन संदीप धुनिया, सोनम ऊर्फ सीमा पंडीत हिला देखील अटक करण्यात आली होती.
या गुन्ह्यात विपिन कुमार हा येरवडा कारागृहात बंद आहे. तर, संदीप धुनिया हा जामिनावर बाहेर होता. त्यानेच कुरकुंभ येथे ‘अर्थकेम लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीमधील केमिकल तज्ज्ञ युवराज भुजबळ याला ‘एमडी’ बनवण्याचे काम दिले होते. ३० जानेवारी रोजी संदीप धुनिया हा नेपाळमधील काठमांडू येथे गेला. तेथून तो कुवैतमध्ये पळाला. दरम्यान, त्याने नेपाळमध्ये ‘एमडी’ ठेवण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. दिल्लीमध्ये पुणे पोलिसांनी पकडलेले ‘एमडी’ नेपाळमध्ये लपवून ठेवले जाणार होते. तेथून ते लंडनमध्ये पाठवले जाणार होते.
दरम्यान, या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), सीबीआय, एनसीबी आदी राष्ट्रीय यंत्रणांसह राज्याच्या दहशतवाद विरोधी पथक देखील सहभागी झाले आहे. ‘टेरर फंडिंग’, ‘अंडरवर्ल्ड’ यासह हवाला रॅकेटचा देखील तपास केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-घरबसल्या करता येणार मतदान; यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा, वाचा..
-दिलासादायक! भर उन्हाळ्यात पुणेकरांची पाणी कपात टळली; कालवा समितीच्या बैठकीत निर्णय
-घड्याळात वेळ झाली तुतारी वाजवण्याची; शरद पवार गटाकडून अनावरण सोहळ्याचा व्हिडीओ रिलीज
-शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत प्रचाराचा नारळ फोडणार!; अनेक विकासकामांचं उद्घाटन
-कात्रजच्या ‘क्वालिटी बेकरीत’ एक्सपायर फुडची विक्री; हिंदुत्ववादी संघटनेकडून बेकरीची तोडफोड