पुणे: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले असून शहरामध्ये अनेक ठिकाणी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये पार्ट्यांचे नियोजन देखील करण्यात आलं आहे. 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी अनेक ठिकाणी पब आणि हॉटेलमध्ये इव्हेंट्स आयोजित करण्यात आले असून या सर्वांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस देखील सज्ज झाले आहेत. शहरामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
पुणे शहरात ३१ डिसेंबर रोजी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून CCTV च्या माध्यमातून लाईव्ह मॉनिटरिंग केले जाणार आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या मद्यपींवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. ७०० च्यावर वाहतूक विभागातील पोलीस रस्त्यावर असणार आहेत.
शहरात जवळपास ३००० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता तसेच जंगली महाराज रस्त्यावर न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ न देण्यासाठी नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.