पुणे: लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपकडून प्रत्येक मतदारसंघात शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळी अभियाने राबवली जात आहेत. आज पुण्यामध्ये पक्षाच्या 44 व्या वर्धापन दिनाचे अवचित साधत दहा हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ‘हर घर मोदी परिवार’ अभियान राबवण्यात आले. यामध्ये उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ १० हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून १० लाख मतदारांपर्यंत ‘मोदींचा नमस्कार’ पोहोचविण्यात आला.
पुणे लोकसभा मतदारसंघात आयोजित या अभियानाला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शहर अध्यक्ष धीरज घाटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी प्रमुख सहभाग नोंदवला.
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना, काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 370 वे कलम हटविले, पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले, 80 कोटी जनतेला मोफत धान्य, 12 कोटी शौचालयांची बांधणी तसेच विकसित भारताच्या दिशेने वाटचाल या मोदी सरकारच्या महत्त्वाच्या योजना कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहचवल्या.
यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘विकसित भारताच्या संकल्पनेला जनतेने साथ द्यावी अशी विनंती आम्ही करत आहोत. त्याला पुणे शहरातील मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोदींनी दहा वर्षे केलेले कार्य आणि विकसित भारताचा संकल्प यामुळे जनता कमळ चिन्हाचे बटन दाबून तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान पदाची संधी देईल असा विश्वास वाटतो.’