पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून तयारी सुरु आहे. राजकीय गाठीभेटी, बैठका, सभा, दौरे, पक्षांतर अशा राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावरुन खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत. वडगाव शेरी या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षासाठी ती जागा सोडायची असा महायुतीचा फॉर्म्युला असताना वडगाव शेरीची जागा भाजपला मिळावी असा घाट भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घातला आहे.
वडगाव शेरी मतदारसंघाची जागा ही भाजपकडे ठेवावी, अशी मागणी आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे. भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांना पुणे जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपच्या वडगाव शेरी मतदारसंघातील पदाधिकांऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने मुरलीधर मोहोळ यांचे काम केले नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जागा मिळावी, अन्यथा आम्ही काम करणार नाही, असे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अर्जुन जगताप म्हणाले आहेत. यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा वाद शिगेला पोहचला असल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेकडून रस्तांची मलमपट्टी; ९ दिवसांत किती खड्डे बुडवले?
-पर्वतीत आबा बागुलांनी ठोकला शड्डू, कार्यकर्तेही लागले कामाला; बॅनर्स झळकवत….
-भक्तांच्या ‘त्या’ मागणीचा ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ने राखला मान, काय होती मागणी?