पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेसमध्ये शहराध्य बदलावरुन मोठा वाद सुरु आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष बदलासंदर्भात दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. याच भेटीमध्ये पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना बदलून नव्या काँग्रेस कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी द्या, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावर आता अरविंद शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत सरकारनामाने वृत्त दिले आहे.
काय म्हणाले अरविंद शिंदे?
“ज्या शिष्टमंडळाने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊन शहराध्यक्ष बदलण्याची मागणी केली. त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेश बागवे यांचा समावेश होता. रमेश बागवे यांना माझ्या कार्यशैलीबाबत काही आक्षेप असेल तर त्यांनी त्याबाबत माझ्याशी चर्चा करणं आवश्यक होतं. काँग्रेसच्या अंतर्गत बाबी चव्हाट्यावर आणणे अत्यंत चुकीचे असून अजूनही रमेश बागवे यांच्याशी मी चर्चा करायला तयार आहे. माझ्या कार्यशैलीबाबत काही समस्या असतील तर त्या चर्चेतून सुटु शकतात.”
‘मी पुण्याचा शहराध्यक्ष असताना यंदाची लोकसभा निवडणूक लढली गेली. माझ्या कामाचा फटका या लोकसभेत बसल्याचें काही जण म्हणत आहेत. पण आकडेवारीवरुन दिसतं की, या निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना सर्वात जास्त लीड हे माझ्या प्रभागातून मिळाले आहे. धंगेकर यांना एकमेव कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात १६ हजारांचे लीड मिळाले त्यामध्ये साडे ८ हजार लीड हे माझ्या प्रभागातून मिळाले आहे.
मी शहराध्यक्ष असतानाच कसबा पोट निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मोठा विजय देखील झाला आहे. त्यामुळे माझ्यावर आक्षेप घेणाऱ्या आणि माझ्या कार्यपद्धतीवर बोट ठेवणाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रभागातून रवींद्र धंगेकर यांना किती मताधिक्य मिळवून दिले हे सांगावं, असे म्हणत खुलं आव्हान अरविंद शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, काँग्रेसमध्ये झालेल्या सुरु असलेल्या वादाचे लोकसभा निवडणुकीवर पडसाद उमटले. यावर वरिष्ठ पातळीवर कोणतेही निर्णय घेण्यात आले नाहीत. मात्र, काँग्रेसमध्ये अद्यापही एकमेकांवर खापर फोडणं सुरुच आहे. येत्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये हा वाद सुरुच राहिला तर लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी या वादावर तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
-अन् पुण्यातल्या खड्यांवरून मोहोळ झाले आक्रमक, म्हणाले “कामात हयगय करणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना…”
-भाजपचे कार्यकर्ते करणार वाहतूक पोलिसांना मदत; शहराध्यक्ष धीरज घाटेंची माहिती
-१५ दिवसांत शरद पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?