पुणे : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी भाजपने देशभरातील 195 जागांवर उमेदवार जाहीर केले असले तरी यामध्ये महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. त्यामुळे पुणे शहरात देखील भाजपसह काँग्रेस आणि इतर पक्षांकडून कोणाला उमेदवारी मिळणार? यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. एका बाजूला लोकसभेची चर्चा असतानाच गेल्या काही काळापासून राजकारणाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात मात्र पोस्टर वॉर रंगताना दिसत आहे.
भाजपचे कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या वतीने हे पोस्टर्स लावण्यात आले असून गेल्या वर्षभरात मतदारसंघात केलेल्या कामांचा पाढा यामध्ये वाचण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना RTE प्रवेशासाठी केलेल्या मदतीपासून ते जुन्यावाड्यांच्या युडीसीपीआर कायद्यातील शिथलता, असे अनेक विषय आपण सोडवले असल्याचं दावा या माध्यमातून करण्यात आला आहे. “होय हे आम्हीच केलं” ही टॅगलाईन देत लावण्यात आलेल्या या पोस्टर्सची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे शहरात लोकसभेचे वातावरण तापलेले असताना कसब्यात मात्र पोस्टरवॉर सुरू असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे आमदार धंगेकर यांच्याकडून देखील अनेक भागांमध्ये कामाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
धंगेकरांच्या कृतज्ञता रॅलीची चर्चा
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीला नुकतेच एक वर्ष पूर्ण झालं. आपल्या विजयाच्या वर्षपूर्ती निमित्त काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी कृतज्ञता रॅली काढत पुन्हा एकदा नागरिकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम केला, परंतु धंगेकर यांच्यासोबत काही निवडक कार्यकर्तेच यामध्ये दिसून आल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी पोटनिवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते आणि मित्रपक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“राष्ट्रवादीत फूट नाही आणि पवार कुटुंबातही फूट नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
-“अमोल कोल्हे फिल्मी डायलॉगबाजी करणारे खासदार! धाकल्या धन्याचं नाव घेवून पैसे कमावतात”
-‘या निवडणुकीनंतर अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात येणार’; रोहित पवारांचा विश्वास
-आढळराव राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत; अजित पवारांनी टाळला नामोल्लेख