पुणे : भाजपकडून पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आली आहे. मोहोळ यांच्या रूपाने भाजपने पुणे शहरात परिचित असणारा चेहरा देत उमेदवारीच्या स्पर्धेत असणाऱ्या इच्छुकांना धक्का दिला. परंतु आज लोकसभेची संधी मिळालेले मोहोळ यांना देखील दोन वेळा विधानसभेची संधी डावलण्यात आली होती. प्रथम २०१४ ला कोथरूड विधनाभेला उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना विद्यमान राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्यामुळे मोहोळ यांची संधी हुकली, २०१९ साली मोहोळ यांनी मतदारसंघात वातावरण निर्मिती केली होती. मात्र तेव्हाही चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देत भाजपने धक्कातंत्राचा वापर केला. पक्षात सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी तेव्हाही संयम ठेवत शांत राहण्याची भूमिका घेतली. आज लोकसभेला उमेदवारी मिळाल्याने पुण्याचा कारभारी होण्याची त्यांची आजवरची इच्छा पूर्ण होणार का? हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.
मुळशी तालुक्यातील मूळचे मुठा गावचे असणारे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे लाल मातीतून आलेला कार्यकर्ता म्हणून देखील पाहिलं जात. भाजपमध्ये युवा मोर्चा माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली. पुणे महापालिकेत चार वेळा नगरसेवक, भाजपची पहिल्यांदाच पालिकेत सत्ता आल्यानंतर २०१७-१८ मध्ये स्थायी समिती अध्यक्ष अन् लगेच महापौर म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. कोरोनाच्या काळामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी रस्त्यावर उतरून केलेलं काम पुणेकरांच्या चांगलं पसंतीस पडलं, येथूनच भाजपचं पुण्यातील पुढील नेतृत्व मोहोळ यांच्याकडे जाणार? अशी चर्चा सुरू झाली.
महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपने पक्ष संघटनेत महत्त्वाच्या असणारे सरचिटणीस पद मोहोळ यांना देत पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांमध्ये अनेक प्रबळ दावेदार असताना मोहोळ यांना संधी देत भाजपने निवडणुकीच्या मैदानात पहिला यशस्वी डाव खेळला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आता वेल्हे तालुक्याचं नाव ‘राजगड’; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय
-मुरलीधर मोहोळांचा वसंत मोरेंना फोन; भाजपमध्ये जाणार? मोरे म्हणाले, ‘मी माझा निर्णय..’
-“हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय, आता या रावणाविरोधात लढणारा बिभीषण मी आहे”
-पुण्यात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेसचा बडा नेता वसंत मोरेंच्या भेटीला