पुणे महापालिकेच्या (पीएमसी) डांबर खरेदीमध्ये अनियमितता होत असून, नागरिकांच्या कराच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुरवठादाराकडून डांबर प्रत्यक्षात न येताही त्याला डिलिव्हरी पावत्या दिल्या जात असल्याने हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद ठरत आहे. या प्रकारामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
महापालिकेने थेट कंपनीकडून डांबर खरेदी न करता ठेकेदारामार्फत डांबर खरेदी केल्याने आधीच मोठा आर्थिक फटका बसत असताना, एका चलनावर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) दोघांनाही डांबराचा पुरवठा झाल्याचा आरोप माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम यांनी केला आहे.
निकम यांच्याकडून आरोप करण्यात आल्यानंतर महापालिकेकडून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक डांबराच्या गाडीची नोंद ठेवली जाते. त्याचे फोटो, वाहतूक रेकॉर्ड आणि संबंधित कागदपत्रे उपलब्ध आहेत. डांबर खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर आम्ही प्राथमिक स्तरावर चौकशी सुरू केली असून यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पावसकर यांनी दिली आहे.
दरम्यान, एकाच गाडीचा क्रमांक आणि चलनावर डांबराची गाडी एकाच दिवशी महापालिकेकडे आणि पीडब्ल्यूडीकडे देखील खाली करण्यात आल्याचे दाखवण्यात आली का? याची प्रथम खातरजमा केली जाईल. आमच्याकडे गाडी खाली करणाऱ्या संबंधित व्यक्तीची स्वाक्षरी असणारी पावती असते, पीडब्ल्यूडीकडील रेकॉर्डशी त्याची तुलना केली जाईल आणि यामध्ये गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पावसकर यांनी सांगितले आहे.
थेट खरेदीऐवजी निविदा – भ्रष्टाचाराला चालना?
पूर्वी पीएमसी रस्त्यांसाठी थेट सरकारी रिफायनरीकडून डांबर खरेदी करत होती. त्यामुळे सवलती मिळत आणि व्यवहार पारदर्शक राहात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून खरेदी आणि वाहतूक यासाठी एकत्रित निविदा निघू लागल्या. या निविदेतील अटी एका विशिष्ट पुरवठादाराला अनुकूल असल्याचा आरोप करण्यात येत आहे.