पुणे : अलिकडच्या काळात फास्टफूडचा जमाना आला असून पिझ्झा बर्गर खाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच आता पिंपरी- चिंचवडमध्ये पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. अरुण कापसे यांनी याबाबतची तक्रार केली असून जय गणेश साम्राज्य मधील ‘डॉमिनोज पिझ्झा’मधून पिझ्झा खरेदी करू नये, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
अरुण कापसे यांनी शुक्रवारी स्पाईन रोड येथील जय गणेश साम्राज्य ‘डॉमिनोज पिझ्झा’मधून पिझ्झा ऑर्डर केला होता. यासाठी त्यांनी ५९६ रुपये देखील त्यांना ऑनलाईन दिले. पिझ्झा खाताना त्यामध्ये चक्क चाकूचा तुकडा आढळला. पिझ्झा खाताना तो चाकूचा तुकडा कापसेंना टोचला आणि ते किरकोळ जखमी झाल्यामुळे ही बाब समोर आली.
कापसे यांनी डोमिनोज मॅनेजरला याबाबत माहिती दिली. आधी टाळाटाळ करणाऱ्या मॅनेजरने फोटो पाठवल्यानंतर अरुण कापसे यांच्या घरी धाव घेऊन सोशल मीडियात फोटो व्हायरल न करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर कापसेंनी ग्राहकांना डॉमिनोज पिझ्झामध्ये पिझ्झा न खाण्याचं आवाहन केलं. त्यामुळे बाहेरील अन्नपदार्थ खाताना लहान मुले तसेच स्वत:ची काळजी घेणं आवश्यक आहे.