पिंपरी चिंचवड : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना त्यांच्याच बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये धक्क्यावर धक्के मिळत होते. माजी आमदार विलास लांडे हे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात. त्यांनी देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची साथ सोडली होती. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी देखील अजित दादांची साथ सोडत तुतारी हाती घेतली होती. त्यानंतर आता अजित गव्हाणे आणि विलास लांडे यांनी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
‘कै. अण्णासाहेब मगर यांनी नगरपालिका स्थापन केली. त्यानंतर अनेक लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या मदतीने शहराचा विकास झाला. अजित पवार यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये मोठं काम झालं. त्यावेळी वसंतदादा पाटील यांनी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल उभं करण्यात फार मोठं योगदान दिलं आहे. हे सर्व फार जवळून पाहिलं आहे. काम करणारी माणसं अतिशय मोठी होती आणि त्यांचं काम आदराने घेणे गरजेचे आहे. यामध्ये अजित पवार यांचा देखील काम खूप मोठं काम आहे’, असं विलास लांडे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.
‘यशवंतराव चव्हाण यांनी एमआयडीसी आणली नसती तर ही महानगरपालिका दिसली नसती. हे खेडेगाव असलं असतं. पण या मोठ्या लोकांनी हे शहर उभं करण्यामध्ये फार मोठं योगदान दिलं. महानगरपालिकेमध्ये 1992 पासून अजित पवार यांनी लक्ष दिले. तेव्हापासून या शहराचा चेहरा मोहरा बदलला गेला आणि त्याचं श्रेय फक्त अजित पवार यांना आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकी वेळी विलास लांडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार’, असं विलास लांडे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
दरम्यान, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवारांनी अजित पवार यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्कातंत्राचा वापर करत फोडफोडीचं राजकारण केलं. भोसरी विधानसभा निवडणुकीत विलास लांडे यांनी तुतारीचा प्रचार केला. मात्र आता लांडे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अजित दादांची साथ देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शहराध्यक्ष राहिलेल्या अजित गव्हाणे यांनी देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी साथ सोडली अन् तुतारी फुंकली. आता 20 नगरसेवकांसह गव्हाणे पुन्हा घड्याळ हातात घेणार असून गव्हाणे यांचं अजित पवारांशी बोलणं झालं असल्याचा दावा विलास लांडे यांनी केला आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी ऐन निवडणुकीत दिलेल्या धक्क्यांचा अजित पवार बदला घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-किरीट सोमय्यांचा मोठा दावा; ‘…तेव्हा वाल्मिक कराड सुप्रिया सुळेंसोबत होता’
-पुण्यात कंटेनरचा थरार; भरधाव वेगाने पोलिसांच्या गाडीसकट २०-२५ गाड्या उडवल्या
-कृषी मंत्र्यांकडून पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख; अजित पवार म्हणाले, ‘अरे तो पहाटेचा…’
-‘राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन्…’; बीडच्या गुन्हेगारीवरुन शरद पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप
-पुणे शहर पोलीस दलातील २३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; पोलीस आयुक्तांचे आदेश