पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून उमेदवारीसाठी इच्छुक वरिष्ठांकडे वारंवार मागणी करत आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणुकीसाठी यंदा महाविकास आघाडीत जागा वाटपात पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला घ्यावा आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर करावा यासाठी रविवारी बागुल समर्थकांनी पुन्हा काँग्रेस भवनात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. विशेष म्हणजे यावेळी मतदारसंघातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे नागरिकही सहभागी झाल्याचे पहायला मिळाले आहेत.
काँग्रेस भवन येथे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या सुरू असलेल्या मुलाखती दरम्यान आबा बागुल यांच्या समर्थकांनी वाजत गाजत येवून घोषणांनी काँग्रेस भवन दणाणून सोडले. यावेळी मुलाखतीसाठी आलेल्या आबा बागुल यांच्यात ठाम विश्वास दिसून आला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘परत घ्या परत घ्या, पर्वती काँग्रेसकडे घ्या’, ‘आबांचे काम दमदार, आता ‘आबा’च पर्वतीचे आमदार’ अशा घोषणा देत पर्वती मतदारसंघासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यापूर्वीही आबा बागुल समर्थकांनी पर्वतीसाठी आग्रही मागणी केली होती.
काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ असल्याने आबा बागुल यांनी दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, असे साकडेही घातले होते. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही यंदा आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला घेतला जाईल, असे जाहीर केले होते. प्रभाग असो अथवा वॉर्ड आबा बागुल हे सलग सहा वेळा म्हणजे ३० वर्षे महापालिकेत लोकप्रतिनिधित्व करत आलेले आहेत.
काँग्रेसचे निष्ठावंत आणि पुणेकरांचे श्रावणबाळ, व्यक्ती एक प्रकल्प अनेक हीच त्यांची ओळख आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली मात्र पक्ष श्रेष्ठींनी समजूत काढताना विधानसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघ काँग्रेसकडे घेतला जाईल, असा शब्द दिला होता. त्यात आजवर अंतर्गत राजकारणात हा मतदारसंघ भाजपलाच पोषक ठरत असल्याचे आबा बागुल यांनी काँग्रेसचे पक्षश्रेठी तसेच लोकनेते शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिले होते. उमेदवारी कुणालाही द्या, पण पर्वती मतदारसंघ काँग्रेसलाच घ्या, अशी आग्रही मागणी त्यांनी आजवर सातत्याने लावून धरली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत इलेक्टिव मेरिट तपासले जाणार आहे. त्यात आतापर्यंतच्या सर्व्हेमध्ये आबा बागुल यांचेच नाव अग्रभागी असल्याने यंदा त्यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी मुलाखतीदरम्यान आबा बागुल यांचा ठाम विश्वास आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहता यंदा पर्वती मतदारसंघात परिवर्तनाचे संकेत मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील कलाकारांना मिळाले हक्काचे ठिकाण, पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे लोकार्पण
-बिग बॉस विजेत्या सुरजने पुण्यात अजित पवारांची घेतली भेट; दादांकडूनही मिळणार मोठं गिफ्ट!
-राज्य सरकारचं महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट; आता मिळणार थेट टाटा कंपनीत नोकरी, पगार किती?
-‘राजकारणात कोण कुठे होता अन् कुठे असेल, काहीच सांगता येत नाही’- संभाजी राजे छत्रपती