पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे सद्या पुणे जिल्ह्याच्या राजकारणात चांगलेच सक्रिय झाल्याचं दिसत आहे. पार्थ यांनी बारामती लोकसभेत येणाऱ्या खडकवासला विधानसभा क्षेत्रात विशेष लक्ष दिल्याचं दिसत असून जुन्या – नव्या नेत्यांच्या गाठीभेटी त्यांच्याकडून घेतल्या जात आहेत. यामध्ये पार्थ यांनी कुख्यात गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजानन मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
पार्थ पवार यांची कुख्यात गुंड गजानन मारणेने सपत्नीक भेट घेतली, यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगार आणि राजकीय नेत्यांच्या संबंधांची चर्चा सुरू असतानाच पवार – मारणे भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
गजा मारणेवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न तसेच खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. शहरात सक्रिय असणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यापैकी मारणेची गँग देखील प्रमुख आहे. त्यामुळे ही भेट नेमकी झाली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.